तालिबान्यांनी शोधली मुल्ला उमरची कार; अमेरिकेच्या भीतीने 21 वर्षांपूर्वी जमिनीत गाडून ठेवली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 10:14 PM2022-07-07T22:14:10+5:302022-07-07T22:14:41+5:30
तालिबानचा संस्थापक मुल्ला उमर याची कार त्याच्या सैनिकांनी जमिनीतून बाहेर काढली आहे. 9/11 च्या हल्ल्यानंतर याच कारमधून तो अमेरिकेतून पळून गेला होता.
काबूल: तालिबानचा संस्थापक मुल्ला उमर याची गेल्या 21 वर्षांपासून जमिनीत गाडलेली कार त्याच्या सैनिकांनी बाहेर काढली आहे. याच कारमधून 2001 मध्ये 9/11 च्या हल्ल्यानंतर मुल्ला उमर अमेरिकेतून पळून गेला होता. या गाडीतून तो कंदहारहून काबुल प्रांतात गेला. जेव्हा अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानात प्रवेश केला, तेव्हा मुल्ला उमरने आपली कार जमिनीत गाडली होती. ही कार बाहेर काढल्यानंतर आता या कारचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मुल्लाची गाडी राष्ट्रीय संग्रहालयात ठेवण्यात येणार
2022 मध्ये अफगाणिस्तानमध्येतालिबान सत्तेवर आल्यावर त्यांनी संस्थापकाची कार शोधण्याचा निर्णय घेतला. यानंतर कारचा शोध सुरू झाला. कार जमिनीत एका प्लास्टिकमध्ये गुंडाळलेली आढळली. एका स्थानिक नागरिकाने सांगितले की, कार चांगल्या स्थितीत आहे, फक्त समोरची काच तुटलेली आहे. मुल्ला उमरची ही कार लवकरच अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
2013 मध्ये उमरचा मृत्यू
मुल्ला उमर त्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत तालिबानचा नेता राहिला. 2013 मध्ये प्रदीर्घ आजारामुळे मुल्ला उमरचा मृत्यू झाल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. मात्र, तालिबानने त्यांच्या कमांडरच्या मृत्यूची बातमी दोन वर्षे गुप्त ठेवली. 2015 मध्ये मुल्ला उमरच्या मृत्यूची माहिती त्यांनी जगाला दिली होती. मुल्ला उमरवर पाकिस्तानमधील रुग्णालयात उपचार करण्यात आल्याचे काही अहवालांमध्ये म्हटले आहे.
कोण होता मुल्ला उमर?
मुल्ला उमर याचा जन्म 1960 मध्ये दक्षिण अफगाणिस्तानातील कंदाहार येथे झाला. मुल्ला याने 1980 मध्ये सोव्हिएत युनियनच्या सैन्याविरुद्ध युद्ध केले. या लढाईत त्याने आपला एक डोळा गमावला. तेव्हापासून त्याला एक डोळा मुल्ला असेही संबोधले जाऊ लागले. सोव्हिएट्ससोबतच्या युद्धानंतर मुल्ला उमरने 1994 मध्ये तालिबानची स्थापना केली आणि 1996 मध्ये अफगाणिस्तानात सत्ता काबीज केली.