तालिबानच्या हाती लागले 8.84 लाख अमेरिकन हत्यारं, आधुनिक विमान आणि हेलिकॉप्टरवरही कब्जा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 02:57 PM2021-08-29T14:57:09+5:302021-08-29T14:59:08+5:30
Afghanistan Crisis: 2003 पासून ही लष्करी उपकरणं अफगाण सैन्य आणि पोलिसांसाठी खरेदी केली जात होती.
काबुल: अमेरिकेनं आपलं सैन्य माघारी बोलावल्यानंतर अफगाणिस्तानमध्येतालिबाननं सत्ता काबीज केली. तालिबानची सत्ता येताच राष्ट्रपतींसह देशातील मोठे नेते देश सोडून पळून गेले. आता देशातील सर्व ठिकाणी तालिबानी सैनिक दिसत आहेत. तालिबानची सत्ता आल्यानंतर जनजीवनही विस्कळात झालंय. आधुनिक हत्यारांनी युक्त असलेल्या तालिबानला आता देशातून पळवून लावणं अवघड झाल्याचं दिसत आहे. पण, अफगाणिस्तानमध्ये अशी परिस्थिती येण्याची ही पहिलीच वेळ नाही.
19 व्या शतकाच्या सुरुवातीपासून अफगाणिस्तान हे इतर मोठ्या देशांसाठी खेळाचं मैदान म्हणून काम करत आलंय. 19 व्या शतकात ब्रिटन, 20 व्या शतकात रशिया आणि 21 व्या शतकात अमेरिका. प्रत्येक वेळी सुरुवातीच्या विजयानंतर, तिन्ही महासत्तांना शेवटी पराभूत व्हावं लागलंय. 1989 मध्ये रशियन सैन्यानं माघार घेतल्यानंतर आधी मुजाहिदीन आणि नंतर तालिबान रशियन AK 47 सह टी -55 टँकवर स्वार होताना दिसले होते. पण, आता हेच तालिबानी अमेरिकेच्या लष्करी वाहनांवर स्वार होऊन हातात M16 रायफल घेतेलले दिसत आहेत.
तालिबानच्या हाती हत्यारांच भांडार
फोर्ब्सच्या अंदाजानुसार, अमेरिकेनं अफगाणिस्तानमध्ये 8,84,311 आधुनिक लष्करी उपकरणं सोडली आहेत. यामध्ये M16 रायफल, M4 कार्बाईन्स, 82 मिमी मोर्टार लाँचर्स यासह हम्वी, ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर, A29 लढाऊ विमान, नाईट व्हिजन, दळणवळण आणि पाळत ठेवण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणांचा समावेश आहे. 2003 पासून ही लष्करी उपकरणं अफगाण सैन्य आणि पोलिसांसाठी खरेदी केली जात होती. फोर्ब्सनं अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या पेंटागॉनच्या डिपार्टमेंट ऑफ लॉजिस्टिक एजन्सी (DLA) च्या डेटाबेसचा अभ्यास करुन हा डेटा गोळा केला आहे.
अफगाणिस्तावर अमेरिकेचा 6 लाख कोटींचा खर्च
तालिबानच्या विरोधात युद्ध पुकारणाऱ्या अमेरिकेनं 2003 पासून अफगाण सैन्य आणि पोलिसांच्या शस्त्रं आणि प्रशिक्षणावर 83 अब्ज डॉलर म्हणजेच 6 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च केला आहे. अफगाणिस्तानमध्ये शिल्लक असलेल्या लष्करी उपकरणांमध्ये 5.99 लाखांहून अधिक शुद्ध शस्त्रे, 76 हजारांहून अधिक लष्करी वाहनं आणि 208 लष्करी विमानांचा समावेश आहे. तज्ज्ञांच्या मते, अफगाणिस्तानच्या सैन्यानं माघार घेतल्यानंतर यातील बहुतेक शस्त्रं तालिबानच्या हाती लागली आहेत. इतकी मोठी शस्त्रे मजबूत सैन्य उभारण्यासाठी पुरेसे आहेत.