तालिबानी नेता अख्तर मन्सूर अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार

By admin | Published: May 23, 2016 04:40 AM2016-05-23T04:40:12+5:302016-05-23T04:40:12+5:30

अफगाणिस्तानातील तालिबानी नेता मुल्ला अख्तर मन्सूर (वय साधारण ५०) हा अमेरिकेने पाकिस्तानातील अंतर्गत भागात केलेल्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला.

Taliban leader Akhtar Mansoor killed in US drone attack | तालिबानी नेता अख्तर मन्सूर अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार

तालिबानी नेता अख्तर मन्सूर अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार

Next

वॉशिंग्टन / काबूल : अफगाणिस्तानातील तालिबानी नेता मुल्ला अख्तर मन्सूर (वय साधारण ५०) हा अमेरिकेने पाकिस्तानातील अंतर्गत भागात केलेल्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला. ही माहिती अफगाणिस्तानच्या गुप्तचर संस्थेने रविवारी जाहीर केली.
बंडखोरांसाठी हा मोठा धक्का मानला जातो. युद्धाने त्रस्त झालेल्या अफगाणिस्तानातील शांतता प्रक्रियेतील मोठा अडथळा मन्सूरच्या मृत्यूमुळे दूर झाला आहे. अफगाणिस्तानच्या सीमेला खेटून असलेल्या अस्वस्थ बलुचिस्तान प्रांतातील अहमद वाल या गावात मन्सूर आणि अन्य एक अतिरेकी शनिवारी वाहनाने गेले असताना अमेरिकेच्या विशेष कारवाई दलांच्या मानवरहित विमानाने (ड्रोन) त्यांना लक्ष्य केले, असे अमेरिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या काही दिवसांपासून मन्सूरवर बलुचिस्तानात खूप जवळून लक्ष ठेवले जात होते, असे अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा संचालकांनी निवेदनात म्हटले. मन्सूर अमेरिकेचे कर्मचारी, अफगाणिस्तानचे नागरिक आणि सुरक्षा कर्मचारी यांच्यासाठी मोठा धोका निर्माण झाला होता, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी म्यानमारची राजधानी नेपिव्दॉ येथे वार्ताहरांशी बोलताना सांगितले. मन्सूरने शांतता वाटाघाटींनाही थेट विरोध केला होता, असेही केरी म्हणाले. अफगाणिस्तानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानचे स्वत:चे सलोख्याचे प्रयत्न हे शांतता निर्माण करण्याचे खात्रीचे मार्ग आहेत ही अमेरिकेची फार पूर्वीपासूनची भूमिका आहे आणि मन्सूर त्याला थेट धोका होता, असे त्यांनी म्हटले. मन्सूरला लक्ष्य करण्याच्या कारवाईला अध्यक्ष बराक ओबामा यांनी परवानगी दिल्यानंतर त्याला लक्ष्य करण्यात आल्याचे पेंटॅगॉनने म्हटले. तालिबानी नेत्यांचा मृत्यू झाल्याच्या खोट्या बातम्या यापूर्वी दिल्या गेल्या होत्या. मुल्ला मन्सूर गेल्या डिसेंबरमध्ये ठार झाला, असे सांगितले गेले होते. तालिबानचा संस्थापक एकाक्ष मुल्ला मुहम्मद ओमर याचे पाकिस्तानात २०१३ मध्ये निधन झाल्यानंतर मन्सूरने जुलै २०१५ मध्ये तालिबानचे नेतृत्व हाती घेतले. मन्सूर हा तालिबानचा नेता होता आणि तो काबूल आणि अफगाणिस्तानातील सरकारी कार्यालयांवर व यंत्रणांवर हल्ले करण्यात सक्रिय होता, असे पेंटॅगॉनचे वृत्तपत्र सचिव पीटर कुक यांनी सांगितले. पाकिस्तानातील अबोटाबादेत २०११ मध्ये अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याला अमेरिकेच्या नेव्ही सिल्सने ठार मारल्यानंतर पाकिस्तानातील अंतर्गत भागात अमेरिकेने क्वचित ड्रोन हल्ले केले आहेत. मुल्ला मन्सूरकडे तालिबानचे नेतृत्व आल्यापासून तालिबानने अनेक हल्ले केले. त्यात हजारो अफगाण नागरिक व सुरक्षा दल कर्मचारी, अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आघाडीचे सैनिक ठार झाले, असे कुक म्हणाले.

Web Title: Taliban leader Akhtar Mansoor killed in US drone attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.