Afghanistan Crisis: तालिबाननं रंग दाखवले! विद्यार्थिंनींना पुरूष शिक्षक शिकवणी देऊ शकणार नाहीत, तालिबानचं फर्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 03:51 PM2021-08-30T15:51:41+5:302021-08-30T15:52:19+5:30
Afghanistan Crisis: अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर अवघे दोन आठवडे झालेले असताना तालिबाननं आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे.
Afghanistan Crisis: अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर अवघे दोन आठवडे झालेले असताना तालिबाननं आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. तालिबाननं संपूर्ण देशात को-एज्युकेशन म्हणजेच एकाच शाळेत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना शिकवण्यास मज्जाव करण्यात आला आहे. यासोबतच यापुढे पुरूष शिक्षक विद्यार्थिनींना शिकवू शकत नाहीत, असं फर्मान जारी केलं आहे.
अफगाणिस्तानचे उच्च शिक्षण मंत्री शेख अब्दुल बाकी हक्कानी यांनी याबाबतची घोषणा केली आहे. अफगाणिस्तानच्या नागरिकांनी आपल्या धार्मिक आणि राष्ट्रीय मूल्यांचं रक्षण करण्यासाठी सक्षम असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. यात युवांनी मोठी जबाबदारी पार पाडली आहे. आता देशातील शिक्षक आणि तज्ज्ञांची जबाबदारी आहे की त्यांनी देशाच्या निर्माणात आपली मोलाची भूमिका पार पाडावी, असं शेख अब्दुल हक्कानी म्हणाले.
देशात लवकरच इस्लामिक मूल्यांचं पालन करुन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी वेगवेगळ्या शिक्षण संस्था सुरू करण्यात येतील, असंही हक्कानी यांनी जाहीर केलं आहे. देशाची राजकीय व्यवस्था अफगाणिस्तानच्या शिक्षण संस्थेला मजबूत करण्यासाठी काम करेल, असंही ते म्हणाले.