कोण होते तालिबानी मंत्री खलील रहमान हक्कानी? ज्यांचा मंत्रालयाबाहेर बॉम्बस्फोटात झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 19:13 IST2024-12-11T19:12:33+5:302024-12-11T19:13:27+5:30

Taliban Refugee Minister Khalil Haqqani : अफगाण युद्धादरम्यान खलील रहमान हक्कानी यांच्यावर आंतरराष्ट्रीय निधी उभारण्याची जबाबदारी होती. ते हक्कानी नेटवर्कचे प्रमुख नेते होते.

Taliban Refugee Minister Khalil Haqqani Killed In Bomb Explosion | कोण होते तालिबानी मंत्री खलील रहमान हक्कानी? ज्यांचा मंत्रालयाबाहेर बॉम्बस्फोटात झाला मृत्यू

कोण होते तालिबानी मंत्री खलील रहमान हक्कानी? ज्यांचा मंत्रालयाबाहेर बॉम्बस्फोटात झाला मृत्यू

Taliban Refugee Minister Khalil Haqqani : अफगाणिस्तान पुन्हा एकदा हादरला आहे. यावेळी स्फोटात तालिबान सरकारला लक्ष्य करण्यात आले आहे. काबूलमधील या स्फोटात तालिबान सरकारमधील मंत्री खलील रहमान हक्कानी यांचा मृत्यू झाला. याशिवाय त्यांच्या तीन अंगरक्षकांसह एकूण १२ जणांचा मृत्यू झाला आहे. निर्वासित मंत्रालयात हा हल्ला झाला. खोस्तहून आलेल्या एका समूहाला होस्ट करत असताना हा हल्ला झाला.

आतापर्यंतच्या तपासात जे समोर आले आहे, त्यानुसार हा आत्मघाती हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, आत्मघाती हल्लेखोर मंत्रालयात कसा पोहोचला? याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. खलील रहमान हक्कानी हे तालिबान सरकारमध्ये निर्वासित आणि स्थलांतर मंत्री होते. त्यांना ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबान सत्तेवर परतल्यानंतर कार्यवाहकच्या आधारावर ही जबाबदारी देण्यात आली होती. तालिबानचे गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी यांचे ते काका होते.

अफगाणिस्तानच्या पक्तिया प्रांतात जन्मलेले हक्कानी हे पश्तूनांच्या जदरान जमातीचे होते. अफगाण युद्धादरम्यान खलील रहमान हक्कानी यांच्यावर आंतरराष्ट्रीय निधी उभारण्याची जबाबदारी होती. ते हक्कानी नेटवर्कचे प्रमुख नेते होते. दरम्यान, ते गेल्या अनेक वर्षांपासून तालिबानसोबत काम करत होते. त्याआधी हक्कानी यांचा काहीकाळ अल-कायदा संघटनेशीही संबंध होता. २००२ मध्ये हक्कानी यांना पक्तिया प्रांतात अल-कायदा संघटना मजबूत करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

हक्कानी नेटवर्कचे प्रमुख नेते
खलील रहमान हक्ककी हे अफगाणिस्तानात कार्यरत असलेल्या हक्कानी नेटवर्कचे प्रमुख नेते होते. हक्कानी नेटवर्कची स्थापना खलील यांचा भाऊ जलालुद्दीन हक्कानी यांनी केली होती. हे नेटवर्क १९९० च्या दशकात तालिबान राजवटीत सामील झाले. त्यावेळी संयुक्त राष्ट्रांनी हक्कानी नेटवर्कला तालिबानसाठी निधी उभारण्याच्या कारवायांमध्ये सहभागी असल्याचे म्हटले होते. खलील रहमान हक्ककी हे इराण, अरब राष्ट्रे आणि दक्षिण आशियातील विविध देशांतून तालिबानसाठी निधी गोळा करत होते.

अमेरिकेने घोषित केले होते दहशतवादी
खलील रहमान हक्कानी यांना ९ फेब्रुवारी २०११ रोजी अमेरिकेने जागतिक दहशतवादी घोषित केले होते. त्यांच्यावर ५ मिलियन अमेरिकन डॉलर्सचे बक्षीसही होते. अल-कायदाशी असलेले संबंध आणि तालिबानच्या सततच्या पाठिंब्यामुळेही त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती.

काय आहे हक्कानी नेटवर्क?
हक्कानी नेटवर्कचा अफगाणिस्तानात बराच प्रभाव आहे. एक काळ असा होता, जेव्हा या ग्रुपला अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएचा पाठिंबा होता. त्यावेळी हा  ग्रुप सोव्हिएत युनियनविरुद्ध लढत होता, नंतर जेव्हा तो अमेरिकेसाठी अडचणीचा ठरला, तेव्हा सीआयए त्यांच्यापासून लांब राहिला आणि या ग्रुपला दहशतवादी म्हणून घोषित केले.हक्कानी ग्रुपवर अफगाणिस्तान, भारत आणि अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये मोठे हल्ले केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे या ग्रुपला पाकिस्तानचाही पाठिंबा आहे.

Web Title: Taliban Refugee Minister Khalil Haqqani Killed In Bomb Explosion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.