Afghanistan Crisis: 'भारत भूमिका बदलेल आणि आमची साथ देईल अशी आशा', तालिबान प्रवक्त्याचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 05:50 PM2021-08-16T17:50:07+5:302021-08-16T17:51:08+5:30
Taliban On India: अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबाननं भारताबाबत मोठं विधान केलं आहे. भारत आपली भूमिका बदलेल आणि आम्हाला साथ देईल अशी आशा तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन यानं व्यक्त केली आहे.
Taliban On India: अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबाननं भारताबाबत मोठं विधान केलं आहे. भारत आपली भूमिका बदलेल आणि आम्हाला साथ देईल अशी आशा तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन यानं व्यक्त केली आहे. अफगाणिस्तानच्या नवनिर्माणासाठीचा तालिबानचा रोडमॅप पूर्णपणे तयार असून लवकरच याची अंमलबजावणी केली जाईल असंही तालिबानकडून सांगण्यात आलं आहे.
"भारत लवकरच आपल्या भूमिकेत बदल असेल अशी आशा आहे. कारण याआधी भारत इथं थोपविण्यात आलेल्या सरकारची बाजू घेऊन बोलत होता. त्यामुळे आता येणाऱ्या नव्या सरकारचीच ते बाजू घेतील कारण दोन्ही देशांसाठी हेच फायद्याचं ठरेल", असं तालिबानी प्रवक्ता सुहैल शाहीननं म्हटलं आहे.
अफगाणिस्तानची राजधानी काबुलस्थित राष्ट्रपती भवनावर रविवारी तालिबान्यांनी कब्जा केला. त्यानंतर संपूर्ण अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळविल्याचं तालिबान्यांकडून जाहीर करण्यात आलं आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी देखील देश सोडून निघून गेले आहेत. काबुलच्या सध्याच्या परिस्थितीबाबत शाहीन म्हणाला की, "आमच्या सुरक्षा दलानं काबुलमधील सुरक्षा व्यवस्था ठीक राहावी यासाठी शहरात प्रवेश केला होता. जेणेकरुन येथील नागरिकांची संपत्ती सुरक्षित राहील आणि कुणालाही त्रास होणार नाही. याआधी आम्ही काबुलच्या सीमेवरच तैनात राहावं असं सैनिकांना सांगितलं होतं. पण काबुलमध्ये लुटमार आणि नागरिकांच्या जीवाला धोका असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे शहरात प्रवेश करावा लागला. त्यानंतर सुरक्षा व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी आमच्या सुरक्षा दलानं परिस्थिती नियंत्रणात आणली आणि सर्व सुत्र हातात घेतली आहेत"
दुतावास आणि राजनैतिक अधिकाऱ्यांची सुरक्षा
भारतासह अनेक देशांनी आपली राजनैतिक अधिकारी आणि नागरिकांना अफगाणिस्तानमधून सुखरूपरित्या परत आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, देशातील सर्व परदेशी दूतावासांना तालिबानकडून सुरक्षा दिली जाईल असं आश्वासन तालिबानी प्रवक्त्यानं दिलं आहे. "आम्ही सर्व परदेशी दूतावास आणि राजनैतिक अधिकाऱ्यांना सुरक्षा देऊ, तर इतर देशांमधील आमच्या दूतावासाबाबतचा निर्णय सरकार अस्तित्वात आल्यानंतर घेतला जाईल", असं सुहैल शाहीन म्हणाला.