Afghanistan Crisis: तालिबाननं वचन मोडलं! काबुलमध्ये नॉर्वेच्या दूतावासावर कब्जा, विद्यार्थ्यांची पुस्तकं फाडली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 06:17 PM2021-09-09T18:17:43+5:302021-09-09T18:18:13+5:30
Afghanistan Crisis: अफगाणिस्तानात तालिबानचं रुप आता दिवसेंदिवस अधिक हिंसक होत चाललं आहे. तालिबानकडून अनेक वचनं दिली जात असली तरी प्रत्यक्षात त्याच्या उलटचं घडतंय.
Afghanistan Crisis: अफगाणिस्तानाततालिबानचं रुप आता दिवसेंदिवस अधिक हिंसक होत चाललं आहे. तालिबानकडून अनेक वचनं दिली जात असली तरी प्रत्यक्षात त्याच्या उलटचं घडतंय. काबुलमध्ये तालिबान्यांनी नॉर्वेच्या दूतावासावर कब्जा केला आहे. इतकंच नव्हे, तर दूतावासात तोडफोड देखील केली आहे. इराणमध्ये नॉर्वेच्या राजदूतांनी याचा एक फोटो देखील ट्विट केला आहे. नॉर्वेच्या दूतावासात शिरुन तालिबान्यांनी दारुच्या बाटल्या फोडल्या आणि विद्यार्थ्यांची अनेक पुस्तकं देखील फाडून टाकली आहेत. (Taliban taken over Norwegian embassy in Kabul ambassador to Iran tweets the picture)
"तालिबान्यांनी काबुलमधील नॉर्वेच्या दूतावासावर कब्जा केला आहे. आता ते आमच्यापर्यंतही पोहोचली. याआधी त्यांनी दूतावासात शिरुन दारुच्या बाटल्या फोडल्या आहेत. विद्यार्थ्यांची पुस्तकं फाडून टाकली आहेत. परिस्थिती गंभीर होत आहे", असं ट्विट नॉर्वेचे राजदूत सिग्व्लाड हॉग यांनी केलं आहे.
Taliban has now taken over the Norwegian Embassy in Kabul. Say they will return it to us later. But first wine bottles are to be smashed and childrens’ books destroyed. Guns apparently less dangerous. Foto: Aftenposten, Norway pic.twitter.com/0zWmJXmQeX
— Ambassador Sigvald Hauge (@NorwayAmbIran) September 8, 2021
अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर कब्जा मिळवल्यानंतर तालिबाननं पत्रकार परिषद घेतली होती. त्यात तालिबानचं वेगळच रुप पाहायला मिळालं होतं. देशातील सर्व दूतावासांवर हल्ला केला जाणार नाही. सर्व दूतावासांना सुरक्षा दिली जाईल याची ग्वाही तालिबान्यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. तसंच आमचं आता कुणाही सोबत शत्रुत्व राहिलेलं नाही आणि आम्ही सर्वांना माफ केलं आहे, असं तालिबानच्या प्रवक्त्यानं जाहीर केलं होतं. पण वास्तविक परिस्थिती पाहता तालिबान्यांनी दिलेलं वचन मोडलं असल्याचं दिसून येत आहे.
तालिबाननं जाहीर केलेल्या सरकारमध्ये बहुतांश मंत्री हे आंतरराष्ट्रीय दहशतवादी असून त्यांनी काहींवर कोट्यवधींची बक्षीसं जाहीर झालेली आहेत. त्यामुळे तालिबानी सरकारबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. तालिबानी सरकारचं नेतृत्त्व हबीतुल्ला अखुंजदा याच्याकडे देण्यात आलं आहे. तर हक्कानी नेटवर्कच्या सिराजुद्दीन हक्कानी याला देशाचं गृहमंत्री घोषीत करण्यात आलं आहे.