तालिबान अफगाण सीमेवर तैनात करणार 'आत्मघाती बॉम्बर्स', रिपोर्टमध्ये दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 01:05 PM2021-10-03T13:05:26+5:302021-10-03T13:05:35+5:30
तालिबानने आत्मघाती हल्लेखोरांची एक विशेष बटालियन बनवली आहे. ही बटालियन अफगाणिस्तानच्या सीमेवर तैनात असेल.
काबुल: वीस वर्षानंतर अफगाणिस्तानची सत्ता काबीज केल्यानंतर तालिबानने देशात अनेक बदल केले आहेत. तसेच, तालिबानच्या आधीच्या शासनाचा अनुभव असल्यामुळे अफगाणिस्तानमध्ये अशांतता आणि भीतीचे वातावरण आहे. यातच आता काही मीडिया रिपोर्टमधून अशी माहिती मिळत आहे की, तालिबान आत्मघाती बॉम्बर्सची एक विशेष बटालियन तयार केली आहे. ही बटालियन अफगाणिस्तानच्या सीमेवर, विशेषत: बदाखशान प्रांतात तैनात केली जाईल.
खामा प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, बदाखशान प्रांताचे डेप्युटी गव्हर्नर मुल्ला निसार अहमद अहमदी यांनी माध्यमांना बदाखशानच्या ईशान्य प्रांतात आत्मघाती बॉम्बर्सची एक बटालियन तयार करण्याविषयी माहिती दिली आहे. या प्रांताची सीमा ताजिकिस्तान आणि चीनशी लागून आहे. अहमदी म्हणाले की, या बटालियनचे नाव 'लष्कर-ए-मन्सुरी' आहे आणि ते देशाच्या सीमेवर तैनात केले जातील.
अहमदी पुढे म्हणाले, ही बटालियन नसती तर अमेरिकेचा पराभव शक्य झाल नसतं. हे शूर सेनानी स्फोटकं परिधान करुन अफगाणिस्तानातील अमेरिकेची ठिकाणं उडवतील. या बटालियनमधील सैनिकांना आपल्या जीवाची भीती नाही, त्यांनी स्वतःला अल्लाला समर्पित केलं आहे. तालिबानने 'लष्कर-ए-मन्सुरी'सह 'बद्री 313' बटालिनचीही स्थापना केली आहे. हा सर्वात सुसज्ज आणि आधुनिक लष्करी गट म्हणून ओळखला जातो. ही बटालियन काबूल विमानतळावर तैनात आहे.