पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये मोदींच्या पराभवाची चर्चा
By admin | Published: November 8, 2015 06:57 PM2015-11-08T18:57:09+5:302015-11-08T18:57:09+5:30
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाल्याने देशभरात चर्चा रंगली असतानाच पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांमध्येही बिहार निवडणूक सुपरहिट ठरली आहे.
ऑनलाइन लोकमत
कराची, दि. ८ - बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाल्याने देशभरात चर्चा रंगली असतानाच पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांमध्येही बिहार निवडणूक सुपरहिट ठरली आहे. पाकिस्तानमधील सर्वच प्रसारमाध्यमांमध्ये बिहार निवडणुकीत मोदींचा पराभव झाल्याच्या बातमीला अग्रस्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे यात 'मोदींचा पराभव' असाच उल्लेख करण्यात आला आहे.
बिहार निवडणुकीत चुकून भाजपाचा पराभव झाल्यास पाकिस्तानमध्ये फटाके फुटतील असे वादग्रस्त विधान अमित शहा यांनी केले होते. यानंतर बिहारमधील निवडणुकीत प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये पाकिस्तानचाही समावेश होता. याची दखल पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांनीही घेतली होती. रविवारी मतमोजणीत बिहारमधील जनतेने जदयूप्रणित महाआघाडीला भरभरुन मतं दिली व भाजपाचा जोरदार दणका दिला. भाजपाच्या पराभवाला पाकिस्तानमधील डॉन, जिओ टीव्ही, दुनिया टीव्ही, ट्रिब्यून अशा विविध प्रसारमाध्यमांनी बिहारसारख्या महत्त्वाच्या राज्यात मोदींचा पराभव झाल्याचे म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर बिहारमध्ये पहिल्यांदाच हिंदूत्ववादी मोदींचा पराभव झाला असा उल्लेख सर्वच वृत्तपत्रांमध्ये दिसून येतो.भाजपाला तीस टक्के जागाही मिळवत्या आल्या नाहीत असे वृत्तात म्हटले आहे.