नरेंद्र मोदींची चिनी राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
By Admin | Published: July 16, 2014 02:14 AM2014-07-16T02:14:00+5:302014-07-16T02:14:00+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी बातचीत केली. यावेळी उभय देशांतील सीमा वादावर तोडगा काढण्यावर मोदींनी जोर दिला
फोर्तालेझा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी बातचीत केली. यावेळी उभय देशांतील सीमा वादावर तोडगा काढण्यावर मोदींनी जोर दिला. उभय देशांना या मुद्यावर सौहार्दपूर्ण तोडगा काढता आल्यास शांततापूर्ण पद्धतीने समस्या सोडविण्यासाठीचे ते एक आदर्श उदाहरण ठरेल, असे मोदी यांनी यावेळी नमूद केले.
आजपासून सुरूहोणाऱ्या ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी उभय नेते सोमवारी संध्याकाळी ब्राझीलमध्ये दाखल झाले. येथे आल्यानंतर काही वेळातच उभय नेत्यांमध्ये ही बातचीत झाली. ‘ही चर्चा चांगली झाली,’ असे सांगण्यात आले.
उल्लेखनीय म्हणजे, उभय नेत्यांमधील ही पहिलीच बैठक ४० मिनिटे चालणार होती. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी ८० मिनिटे चर्चा केली. यात द्विपक्षीय मुद्यांवर विनाअडथळा चर्चा झाली. चिनी राष्ट्राध्यक्ष हे सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीचे महासचिवही आहेत.
दोन्ही बाजूंनी सीमा वादावर तोडगा काढण्याच्या आवश्यकतेवर भर देण्यात आला. पंतप्रधानांनी परस्पर विश्वास वृद्धी आणि सीमेवर शांतता कायम राखण्यावर जोर दिला, असे पंतप्रधान कार्यालयाद्वारे जारी निवेदनात म्हटले आहे.
भारताच्या मते, हा वाद ४,०५७ किलोमीटरच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगतच्या प्रदेशाशी निगडित आहे. मात्र, चीनद्वारे उभय देशांतील सीमावाद हा अरुणाचल प्रदेशच्या २,००० किलोमीटरच्या मर्यादेपर्यंतचा संबंधित असल्याचा दावा केला जातो. या भागाला चीनकडून दक्षिण तिबेट म्हणून संबोधले जाते. (वृत्तसंस्था)