दावोसमध्ये कंपन्यांशी चर्चा; गावे, छोट्या शहरांत उद्योग आणणार - एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 07:11 AM2024-01-18T07:11:28+5:302024-01-18T07:11:44+5:30

स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषद सुरू असून तेथील काँग्रेस सेंटर सभागृहात नागरी क्षेत्रातील आव्हाने, नावीन्यपूर्ण उपक्रम व शाश्वत विकास चर्चासत्रात मुख्यमंत्री शिंदे यांनी विचार मांडले.

talks with companies in Davos; Will bring industry in villages, small towns - Eknath Shinde | दावोसमध्ये कंपन्यांशी चर्चा; गावे, छोट्या शहरांत उद्योग आणणार - एकनाथ शिंदे

दावोसमध्ये कंपन्यांशी चर्चा; गावे, छोट्या शहरांत उद्योग आणणार - एकनाथ शिंदे

महाराष्ट्रातील गावे, शहरांमध्ये आर्थिक विकासाला मोठी गती देणारे नावीन्यपूर्ण उद्योग-व्यवसाय सुरू करण्यात येतील. देशाच्या विकासासाठी मुंबईचाही कायापालट करण्यात येत असून याठिकाणी आपली गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषद सुरू असून तेथील काँग्रेस सेंटर सभागृहात नागरी क्षेत्रातील आव्हाने, नावीन्यपूर्ण उपक्रम व शाश्वत विकास चर्चासत्रात मुख्यमंत्री शिंदे यांनी विचार मांडले. मुख्यमंत्री म्हणाले, जागतिक बँकेच्या अहवालानुसार जगातल्या अनेक भागात तंत्रज्ञानाच्या जोरावर नावीन्यता जिल्हे (इनोव्हेशन डिस्ट्रिक्ट) पुढे आले आहेत.

नावीन्यपूर्ण उद्योग, व्यवसाय,  संशोधन संस्था ही या जिल्ह्यांची वैशिष्ट्ये आहेत. ज्ञानाचे आदानप्रदान आणि तंत्रज्ञानाचा विकास करणारी इकोसिस्टीम या जिल्ह्यांनी तयार केली असून महाराष्ट्रातदेखील अशाच स्वरूपाची इकोसिस्टीम घडविण्यावर भर देण्यात येईल.

एबीआयएन बेव्ह कंपनीसोबत ६०० कोटींचा करार
दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. त्याचप्रमाणे विविध देशांतील शिष्टमंडळांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान बेल्जियम येथील एबीआयएन बेव्ह या बहुराष्ट्रीय पेय कंपनीसोबत महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी ६०० कोटी रुपयांचा सामंजस्य करार झाला. 
संयुक्त अरब अमिरातीचे वाणिज्यमंत्री अब्दुला बिन टौक आणि लुलू हायपर मार्केटचे कार्यकारी संचालक एम. ए. युसुफ अली यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. शिंडलर इलेक्ट्रिकचे आंतरराष्ट्रीय कार्यान्वयन कार्यकारी तथा उपाध्यक्ष मनीष पंत यांच्याशीदेखील चर्चा झाली.

-  भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत स्टार्टअप आणि व्हेंचर कॅपिटल, संशोधन संस्थांसाठी लवचिक अशी इकोसिस्टीम आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. आपण सर्वांनी मुंबईच्या माध्यमातून भारताच्या विकासगाथेत सहभागी व्हावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

Web Title: talks with companies in Davos; Will bring industry in villages, small towns - Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.