ताशफीन भारतात येऊन गेली होती
By admin | Published: December 8, 2015 11:32 PM2015-12-08T23:32:27+5:302015-12-08T23:32:27+5:30
कॅलिफोर्नियातील हत्याकांडात सहभागी संशयित ताशफीन मलिक (२७) पतीसह अमेरिकेत यायच्या आधी २०१३ मध्ये सौदी अरेबियातून भारतात येऊन गेली होती, असे वृत्त मंगळवारी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिले
न्यूयॉर्क : कॅलिफोर्नियातील हत्याकांडात सहभागी संशयित ताशफीन मलिक (२७) पतीसह अमेरिकेत यायच्या आधी २०१३ मध्ये सौदी अरेबियातून भारतात येऊन गेली होती, असे वृत्त मंगळवारी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिले. हत्याकांडानंतर ताशफीन मलिक व तिचा पती सईद फारुक हे पोलिसांनी केलेल्या पाठलागानंतरच्या चकमकीत ठार झाले होते.
ताशफीन मलिक सौदी अरेबियाला दोन वेळा भेट देऊन आली होती, असे वृत्तात सौदी अरेबियाअंतर्गत मंत्रालयाचे प्रवक्ते मन्सूर टर्की यांचा हवाला देऊन म्हटले आहे. या दोनपैकी एका भेटीनंतर ती भारताला रवाना झाली होती. टर्की म्हणाले की, मलिक पाकिस्तानातून जून २००८ मध्ये सौदी अरेबियात तिच्या वडिलांना भेटायला आली होती. सुमारे नऊ महिने ती तेथे राहिल्यानंतर पाकिस्तानला परतली. त्यानंतर ८ जून २०१३ रोजी ती पाकिस्तानातून सौदी अरेबियात आली आणि त्याचवर्षी ६ आॅक्टोबर रोजी भारताकडे रवाना झाली. मात्र, ती भारतात पोहोचली का, तेथे ती कुठे, किती दिवस व कोणाकडे मुक्कामाला होती याची माहिती मिळू शकली नाही, असे वृत्तात म्हटले आहे.
फारुकनेही सौदी अरेबियाला दोन वेळा भेट दिली होती. त्यापैकी एक भेट आॅक्टोबर २०१३ मध्ये हाज यात्रेत होती. त्याची दुसरी भेट जुलै २०१४ मध्ये उमराह यात्रेला होती. हे जोडपे जुलै २०१४ मध्ये जेद्दाहहून अमेरिकेला बरोबरच आले, असे अधिकाऱ्यांनी म्हटले. (वृत्तसंस्था)
ताशफीन मलिकचे पाकिस्तानातील नातेवाईक आणि तिला ओळखणाऱ्यांनी सांगितल्यानुसार ती सौदी अरेबियात लहानाची मोठी झाली आणि तेथे इस्लामचे जे अत्यंत कर्मठ स्पष्टीकरण करण्यात आले त्याचा तिच्यावर खूप खोलवर परिणाम झाला.
सौदी अरेबियात मलिकने लक्षणीय काळ घालविल्याचा सौदीच्या अधिकाऱ्यांनी इन्कार केला व ती सौदीत केवळ दोन वेळाच आली होती व तेही दोन्ही भेटींचा एकूण काळही काही महिन्यांचाच होता, असे ते म्हणाले.