Zika व्हायरसमुळे टाटा मोटर्सच्या Zica गाडीची गोची!
By Admin | Published: February 2, 2016 01:57 PM2016-02-02T13:57:52+5:302016-02-02T14:03:30+5:30
टाटा मोटर्सने झिका नावाची नवीन हॅचबॅक लाँच केली खरी, परंतु झिका व्हायरसमुळे या गाडीचे नाव बदलण्याचा विचार कंपनी करत आहे.
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - टाटा मोटर्सने झिका नावाची नवीन हॅचबॅक लाँच केली खरी, परंतु झिका व्हायरसमुळे जगभरात चिंतेचे वातावरण असल्याचा नकारात्मक परिणाम होण्याच्या शक्यतेमुळे या गाडीचे नाव बदलण्याचा विचार कंपनी करत आहे.
गेल्या काही आठवड्यांमध्ये टाटाने या लहानशा झिकाचं, कँपेनिंग झिप्पी कार असं झोकात केलं व मार्केंटिगसाठी खास लिओनेल मेस्सीला घेतलं.
पण या मॉडेलचं दुर्देव असं की, ही गाडी बाजारात दाखल होतानाच, जगातल्या काही भागांमध्ये झिका व्हायरसने थैमान घातलं आहे. विशेषत: लॅटिन अमेरिकेत झिकाचा प्रादुर्भाव असून, ब्राझिलमध्ये होणा-या ऑलिम्पिकवर त्याची गडद छाया पडली आहे. लहान मुलांच्या मेंदूवर दुष्परिणाम करणा-या या व्हायरसची भीती सगळीकडे पसरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने झिका ही आंतरराष्ट्रीय आरोग्यासाठी आपत्ती असल्याचं सोमवारी म्हणजे काल जाहीर केलं आहे. ऑलिंपिकच्या सुमारास गर्भवती असलेल्या महिलांनी लांब रहावं असं आवाहन ब्राझिलने केलं आहे. मुख्यत: डासांपासून होणारा हा आजार असून त्याची लागण वेगाने पसरते असे सांगण्यात आलं आहे. लहाम मुलांच्या मेंदुच्या वाढीवर अत्यंत प्रतिकूल आणि दूरगामी परिणाम हा व्हायरस करतो.
या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही सगळ्या परिस्थितीचं अवलोकन करत आहोत, अर्थात कुठलाही अंतिम निर्णय अद्याप घेतलेला नाही असं टाटा मोटर्सच्या अधिका-यांनी सांगितल्याचं वृत्त एएफपीनं दिलं आहे.
या आठवड्यात दिल्लीमध्ये होणा-या ऑटो एक्स्पो २०१६मध्ये या कारचं प्रदर्शन होणं अपेक्षित आहे. टाटा मोटर्स काय निर्णय घेतं हे लवकरच कळेल.