मानवी नोक-या हिरावणा-या रोबोटवर टॅक्स लावा- बिल गेट्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2017 02:21 PM2017-02-20T14:21:36+5:302017-02-20T14:51:09+5:30
मनुष्याच्या नोक-या हिरावून घेणा-या रोबोटवरही टॅक्स लावा, अशी मागणी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी केली आहे.
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 20 - मनुष्याच्या नोक-या हिरावून घेणा-या रोबोटवरही टॅक्स लावा, अशी मागणी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी केली आहे. सध्या नोकरीधंदा करणारी जवळपास सर्वच माणसे टॅक्स भरतात. एखाद्या कारखान्यात नोकरी करणारा माणूस जर 50,000 डॉलर कमवत असले तर त्याला प्राप्तिकर आणि सामाजिक सुरक्षा कर भरावा लागतो. त्यामुळे मनुष्याच्या नोक-या हिरावून घेणा-या रोबोटवरही अशाच प्रकारचा टॅक्स लावणे गरजेचे आहे, असं बिल गेट्स यांनी क्वार्ट्ज वेबसाइट सांगितलं आहे.
तसेच रोबोटच्या करातून मिळालेला पैसा वृद्ध आणि लहान मुलांच्या कल्याणासाठी वापरावा. जेणेकरून त्यांचाही विकास करता येईल. त्याप्रमाणेच या रकमेचा काही भाग उत्पन्न कमी असणा-या कर्मचा-यांच्या कल्याणासाठीही खर्च करावा, असंही ते म्हणाले आहेत.
बिल गेट्स हे जगातील श्रीमंतांच्या यादीतील एक नाव आहे. ऑक्सफेमच्या एका संशोधनानुसार बिल गेट्स यांची प्रगती जर अशीच होत राहिल्यास वयाच्या 86व्या वर्षी जगातील पहिले ट्रिलेनियर बनतील, असा एक अंदाज आहे. विशेष म्हणजे जगभरातील अशा कित्येक कंपन्या आहेत, जिथे काम करण्यासाठी यंत्रमानव म्हणजेच रोबोटचा वापर केला जातो. चीन रोबोटच्या माध्यमातून काम सोपं होत असल्यानं रोबोटच्या निर्मितीला प्राधान्य देत आहे. या रोबोटमुळे अनेक कंपन्यांचं काम सोपं झालं असलं तरी अनेक माणसं मात्र बेरोजगार झाली आहेत. त्यामुळेच रोबोटचा वापर करणा-या कंपन्यांकडून कर आकारला जावा, असा सल्ला मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी दिला आहे.