Queen Elizabeth II : महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी 1998 मध्ये वापरलेली टीबॅग eBay वर विक्रीला; जाणून घ्या किंमत...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 04:37 PM2022-09-09T16:37:27+5:302022-09-09T16:39:02+5:30
Queen Elizabeth II : महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर संपूर्ण ब्रिटनमध्ये शोककळा पसरली आहे. देशात 10-12 दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वयाच्या 96 व्या वर्षी गुरुवारी निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर ई-कॉमर्स वेबसाइट eBay ने महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी वापरलेल्या वस्तूंची विक्री सुरू केली आहे, ज्याची किंमत हजारो डॉलर्स आहे. यामध्ये एक टीबॅग eBay वर लिस्टेड करण्यात आली आहे. या टीबॅगचा वापर 1998 मध्ये महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी केला होता, असा दावा विक्रेत्याने केला आहे.
विक्रेत्याचे म्हणणे आहे की, ही टीबॅग महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी 1998 मध्ये वापरली होती. ही टीबॅग विंडसर कॅसलची आहे. टीबॅगच्या सोबत देण्यात आलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये म्हटले आहे की, ही तीच टीबॅग आहे, जी तुम्ही कदाचित 1998 मध्ये सीएनएनवर पाहिली असेल. डिस्क्रिप्शनमध्ये पुढे असे म्हटले आहे की, टीबॅगचा वापर महाराणी एलिझाबेथ द्वितीय रेजिना ब्रिटानियाद्वारे केला होता आणि ती विंडसर कॅसलमधून मिळविण्यात आली आहे.
ही टीबॅग प्रतिष्ठित आयईसीए (Institute of Excellence in Certificate of Authenticity) द्वारे प्रमाणित आहे. दरम्यान, ही टीबॅग तीच आहे, यात शंका नाही, असे आयईसीएने म्हटले आहे. टीबॅग व्यतिरिक्त महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी वापरलेल्या इतर वस्तू देखील लिस्टिंग करण्यात आल्या आहेत. एका विक्रेत्याने महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मेणाच्या पुतळ्यांची यादी दिली आहे. ज्याची किंमत 15,900 डॉलर लिहिली आहे. या डिस्क्रिप्शनमध्ये विक्रेत्याने असा दावा केला आहे की, पुतळ्यामध्ये वास्तविक मानवी केस, रेझिन आयबॉल्स, रेझिट टीथ वापरण्यात आले आहेत.
याचबरोबर महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची एक बार्बी बाहुली 1,299.99 डॉलरमधअये मध्ये लिस्टेड करण्यात आली आहे. आणखी एका युजर्सने eBay वर महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा 1977 चा बॉक्स देखील लिस्टेड केला आहे. हा बॉक्स स्टर्लिंग सिल्व्हर आणि कॅलॅमंडर लाकडापासून बनवलेला आहे, ज्याची किंमत 51,597 डॉलर लिहिली आहे. तसेच, महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी स्वाक्षरी केलेला ऑटोग्राफ देखील 11,249 अमेरिकी डॉलरमध्ये विक्रीसाठी आहे.
10-12 दिवसांचा राजकीय दुखवटा
दरम्यान, महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर संपूर्ण ब्रिटनमध्ये शोककळा पसरली आहे. देशात 10-12 दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. भारतातही राणीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाबद्दल भारत सरकारने 11 सप्टेंबरला देशात एक दिवसीय शोक पाळण्याचा निर्णय घेतला आहे, असे गृह मंत्रालयाचे म्हटले आहे.