हाँगकाँगमध्ये निदर्शकांवर अश्रुधूर, पाण्याचे फवारे; १२० जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 06:29 IST2020-05-25T02:13:33+5:302020-05-25T06:29:34+5:30
हाँगकाँगमधील लोकशाहीवादी पाठीराख्यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्याच्या प्रस्तावावर गेल्या आठवड्यात तीव्र टीका केली होती.

हाँगकाँगमध्ये निदर्शकांवर अश्रुधूर, पाण्याचे फवारे; १२० जणांना अटक
हाँगकाँग : हाँगकाँग पोलिसांनी रविवारी येथे निदर्शकांना पांगवण्यासाठी अश्रुधूर सोडला व पाण्याचे फवारे वापरले. हाँगकाँग शहरासाठी चीन कठोर राष्ट्रीय सुरक्षा कायदा करणार असून त्याच्याविरोधात हजारो लोक रस्त्यावर आले होते.
हाँगकाँगमधील लोकशाहीवादी पाठीराख्यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्याच्या प्रस्तावावर गेल्या आठवड्यात तीव्र टीका केली होती. या कायद्याने फुटीरवादी आणि घातपाती कारवायांवर तसेच विदेशी हस्तक्षेपावर बंदी घातली जाईल. हाँगकाँग हा चीनचा भूभाग असला तरी निम-स्वायत्त (सेमी अॅटॉनॉमस) आहे.
टीकाकारांचे म्हणणे असे आहे की, ‘एक देश, दोन व्यवस्था’ याविरुद्ध हा कायदा आहे. या ‘एक देश-दोन व्यवस्था’मुळे हाँगकाँग शहराला प्रत्यक्ष चीनमध्ये जे स्वातंत्र्य नाही ते दिले गेलेले आहे. निदर्शक नियोजित कायद्याचा निषेध करण्यासाठी दुपारी कॉजवे बे डिस्ट्रिक्टमध्ये काळ्या कपड्यांत रस्त्यांत जमले होते. ते ‘हाँगकाँगच्या पाठीशी उभे राहा’, ‘हाँगकाँगला मुक्त करा’ आणि ‘आमच्या काळातील क्रांती’ अशा घोषणा देत होते.
पोलिसांनी अश्रुधुराच्या अनेक फैरी झाडण्यापूर्वी निदर्शकांना निळे झेंडे दाखवून निघून जाण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांनी निदर्शकांना पांगवण्यासाठी पाण्याच्या फवाऱ्यांचाही वापर केला. किमान १२० लोकांना बेकायदा एकत्र जमल्याबद्दल अटक झाल्याची माहिती पोलिसांनी फेसबुकद्वारे दिली. गेल्या वर्षी लोकशाहीसाठी हाँगकाँगमध्ये चळवळ सुरू झाली.