किशोरवयीन मुलाने तयार केले स्वस्त ‘श्रवणयंत्र’

By admin | Published: April 13, 2016 02:51 AM2016-04-13T02:51:19+5:302016-04-13T02:51:19+5:30

भारतीय वंशाच्या एका १६ वर्षीय मुलाने स्वस्त ‘श्रवणयंत्र’ तयार केले असून, केवळ ६० डॉलर एवढी किंमत असलेले हे श्रवणयंत्र महागडे श्रवणयंत्र खरेदी करू न शकणाऱ्यांसाठी ‘वरदान’ ठरणार आहे.

Teenager made cheap 'hearing aid' | किशोरवयीन मुलाने तयार केले स्वस्त ‘श्रवणयंत्र’

किशोरवयीन मुलाने तयार केले स्वस्त ‘श्रवणयंत्र’

Next

ह्यूस्टन : भारतीय वंशाच्या एका १६ वर्षीय मुलाने स्वस्त ‘श्रवणयंत्र’ तयार केले असून, केवळ ६० डॉलर एवढी किंमत असलेले हे श्रवणयंत्र महागडे श्रवणयंत्र खरेदी करू न शकणाऱ्यांसाठी ‘वरदान’ ठरणार आहे.
कंटुकीमधील लुईबिल शहरातील निवासी मुकुंद वेंकटकृष्णन असे या स्वस्त ‘श्रवणयंत्र’ तयार करणाऱ्या मुलाचे नाव आहे. त्याने २ वर्षांपासून या श्रवणयंत्रावर संशोधन केले होते. त्याने ‘जेफरसन काऊंटी पब्लिक स्कूल आयडिया’मध्ये हे यंत्र सादर केले. अलीकडेच त्याने कंटुकी स्टेट सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग फेअरमध्ये या श्रवणयंत्रासाठी प्रथम क्रमांक पटकावला होता. या यंत्राचा वापर स्वस्त हेडफोनच्या साह्यानेही केला जाऊ शकतो. यात विविध स्तराचे आवाज वाजवून हेडफोनद्वारे व्यक्तीच्या ऐकण्याची क्षमता जाणून घेतली जाते. त्यानंतर ठरलेल्या प्रोग्रॅमनुसार एक ‘श्रवणयंत्र’ म्हणून त्याचा वापर केला जाऊ शकतो. व्यक्तीच्या आवाज ऐकण्याच्या क्षमतेनुसार आवाज कमी-जास्त केला जाऊ शकतो.
हे श्रवणयंत्र तयार करणाऱ्या डुवोंट मॅन्युअल हायस्कूलचा विद्यार्थी असलेल्या मुकुंद याने सांगितले की, या श्रवणयंत्राने डॉक्टरची मदत घेण्याची गरज नाही. खरे तर हे ‘अ‍ॅम्प्लिफायर’ (ध्वनिसंवर्धक) आहे. आपल्याला जेवढा मोठा आवाज ऐकायचा आहे तेवढा त्याचा आवाज वाढवता येतो. त्यासाठी सध्या १५०० डॉलरपर्यंत रक्कम घेतली जाते; पण आता हेच काम ६० डॉलरमध्ये होते. येणाऱ्या कोणत्याही सिग्नलचा आवाज वाढविण्यासाठी लागणारे प्रोसेसर याचा सर्वात महागडा भाग आहे.
या प्रोसेसरची किंमत ४५ डॉलर आहे.
दोन वर्षांपूर्वी मुकुंद आपल्या आजी-आजोबांना भेटण्यासाठी भारतात आला होता, त्यावेळी त्याला असे श्रवणयंत्र तयार करण्याची प्रेरणा मिळाली होती. त्याच्या आजी-आजोबांना कमी ऐकू येत असल्याने घेण्यात आलेल्या महागड्या श्रवणयंत्राला पर्याय शोधण्याचे काम त्याने सुरू केले होते. (वृत्तसंस्था)

तज्ज्ञ डॉक्टरांना भेटणेसुद्धा कठीण, मोठी फी द्यावी लागते
मुकुंद म्हणाला की, कमी ऐकू येण्याची समस्या दूर करणारे तज्ज्ञ असतात. त्या डॉक्टरांना शोधणे, त्यांची अपॉइंटमेंट घेणे ही अवघड बाब असते. पुन्हा त्यातून फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी मी ४०० ते ५०० डॉलर खर्च केले आणि श्रवणयंत्रासाठी १९०० डॉलर मोजावे लागले. ऐकण्याची शक्ती मिळविणे ही एक महागडी प्रक्रिया आहे. विकसनशील देशात बहुतेक लोक एवढा प्रचंड खर्च करू शकत नाहीत.
तो म्हणाला की, भारतात एका मध्यमवर्गीय कुटुंबाचे उत्पन्न ६१६ डॉलर प्रतिवर्ष आहे. एखाद्या व्यक्तीने वर्षभर एकही डॉलर खर्च न करता एवढी रक्कम साठवली तरीही त्याला महागडे श्रवणयंत्र खरेदी करणे शक्य नाही.
पारंपरिक यंत्रापेक्षा मी विकसित केलेल्या श्रवण यंत्रातील ‘ईअरपिस’ खराब झाले तर ते बदलणे महाग नाही. आपल्याला केवळ ‘ईअर बड’चा दुसरा सेट खरेदी करावा लागेल. सध्या हे श्रवणयंत्र दोन इंचाचे आहे. कॉम्प्युटर प्रोसेसरप्रमाणे दिसते.
जे लोक एक हजार डॉलरचे श्रवणयंत्र खरेदी करू शकत नाहीत आणि ज्यांना कमी ऐकू येते, अशांना हे स्वस्तातील श्रवणयंत्र वितरित करण्याचा त्याचा मनोदय आहे. अनेक संस्था आता हे श्रवणयंत्र घेऊन ते वितरित करण्यासाठी त्याच्याशी संपर्क ठेवून आहेत. या उन्हाळ्यात आपण बंगळुरूला जाऊन आपण त्यांना हे श्रवणयंत्र देणार आहेत, असे त्याने सांगितले.

Web Title: Teenager made cheap 'hearing aid'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.