Telegram सीईओ Pavel Durov दबावाला बळी पडले? IP Address, नंबर शेअर करणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 04:22 PM2024-09-24T16:22:45+5:302024-09-24T16:25:39+5:30
Telegram CEO Pavel Durov: महिन्याभरापूर्वी टेलिग्रामचे सीईओ पावेल ड्युरोव यांच्यावर फ्रान्समध्ये कारवाई करण्यात आली होती.
Telegram CEO Pavel Durov: फ्रान्स आणि दक्षिण कोरियामध्ये टेलिग्रामविरोधात सुरू असलेल्या तपासादरम्यान सीईओ पावेल ड्युरोव यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कंपनी आता बेकायदेशीर कारवायांच्या प्रकरणांमध्ये तपास अधिकाऱ्यांसोबत वापरकर्त्यांचा IP अँड्रेस आणि फोन नंबर शेअर करणार आहे. टेलिग्रामच्या सीईओने सोमवारी एका पोस्टमध्ये माहिती दिली आहे की, टेलिग्रामवरील गुन्हेगारी कारवाया थांबवण्यासाठी सेवा अटी आणि गोपनीयता धोरणात बदल करण्यात आले आहेत. महिन्याभरापूर्वी टेलिग्रामचे सीईओ पावेल ड्युरोव यांना फ्रान्समध्ये अटक करण्यात आली होती.
फ्रान्सने ड्युरोववर टेलिग्राम अँपवर बेकायदेशीर कृत्यांशी संबंधित ६ आरोप लावले होते, नंतर २८ ऑगस्ट रोजी फ्रेंच न्यायालयाने त्याची ५ मिलियन युरोच्या जामिनावर सुटका केली होती. यानंतर दक्षिण कोरियातही टेलिग्रामची चौकशी सुरू झाली. टेलिग्रामवर दक्षिण कोरियाच्या महिलांच्या डीपफेक पोर्नोग्राफीशी संबंधित आक्षेपार्ह मजकूर अनेकदा पाहिला गेल्याचे आरोप आहेत. ड्युरोव्हच्या अटकेपासून पाश्चात्य देश टेलिग्रामवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला जात होता. ड्युरोवच्या अटकेबाबत विविध अंदाज वर्तवले जात होते. अशा परिस्थितीत ड्युरोवने धोरणात बदल करणे म्हणजे पाश्चात्य देशांच्या दबावाला बळी पडणे आहे का? असा सवाल केला जात आहे.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ड्युरोव्हच्या अटकेमागे कोणतेही राजकीय कारण नसून न्यायव्यवस्था स्वतंत्रपणे आपले काम करत असल्याचे स्पष्ट केले. मात्र आता टेलिग्रामने नियम बदलले आहेत, त्यामुळे दबावाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. टेलीग्रामच्या सेवा, अटी आणि गोपनीयता धोरणातील बदलांबद्दल माहिती देताना, पावेल ड्युरोव यांनी सांगितले की, टेलिग्राम त्यांच्या वतीने वैध कायदेशीर विनंती केल्यास नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे IP अँड्रेस आणि फोन नंबर संबंधित अधिकाऱ्यांसोबत शेअर करेल. कारण अशा उपाययोजनांमुळे गुन्हेगारांना आणि गुन्हेगारीला आळा बसेल, असे ड्युरोव म्हणाले.