सिंगापूरशी दहा करार
By admin | Published: November 25, 2015 12:16 AM2015-11-25T00:16:11+5:302015-11-25T00:16:11+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूरचे त्यांचे समपदस्थ ली सीन लुंग यांची भेट घेतल्यानंतर उभय देशांनी आपल्या संबंधांना व्यूहात्मक भागीदारीच्या स्तरावर पोहोचवत संरक्षण सहकार्य
सिंगापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूरचे त्यांचे समपदस्थ ली सीन लुंग यांची भेट घेतल्यानंतर उभय देशांनी आपल्या संबंधांना व्यूहात्मक भागीदारीच्या स्तरावर पोहोचवत संरक्षण सहकार्य, सायबर सुरक्षा, जहाजबांधणी आणि नागरी उड्डयन यासारख्या क्षेत्रांसाठीच्या द्विपक्षीय करारांवर स्वाक्षरी केली.
यात व्यूहात्मक भागीदारीवरील उभय पंतप्रधानांच्या संयुक्त जाहीरनाम्याचाही समावेश होता. संयुक्त जाहीरनाम्यात म्हटले आहे की, भारत व सिंगापूर आपले द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करून त्यांचे व्यूहात्मक भागीदारीत रूपांतरित करतील. संरक्षण सहकार्य करारात संरक्षण मंत्रीस्तरावरील चर्चा, सशस्त्र दलांचा संयुक्त सराव व संरक्षण उद्योगांदरम्यान सहकार्याची तरतूद आहे. उभय देश नागरी विमानसेवा आणि विमानतळ व्यवस्थापनाच्या क्षेत्रात परस्पर सहमतीने सहकार्य वाढवतील. याचा प्रारंभ जयपूर आणि अहमदाबाद येथील विमानतळांहून होईल. याशिवाय उभय देश नगररचना, सांडपाण्याची विल्हेवाट, घन कचरा व्यवस्थापन व सार्वजनिक-खासगी भागीदारीवरील आपले अनुभव आणि माहितींची देवाणघेवाण करतील. तसेच अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी परस्परांना सहकार्य करण्याच्या करारावरही स्वाक्षरी करण्यात आली. (वृत्तसंस्था)
सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित करारासह एकूण दहा द्विपक्षीय दस्तावेज आणि करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. उभय देशातील व्यापक संबंधांचे हे द्योतक आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी टष्ट्वीटरवरून सांगितले.
भारतात अमर्याद संधी
- सिंगापूर : भारताच्या जवळजवळ सर्व क्षेत्रात बदल घडवून आणण्यातील सिंगापूरचे योगदान अधोरेखित करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रगतीची नवनवी शिखरे पादाक्रांत करत असलेला भारत अमर्याद संधींची भूमी आहे, असे मंगळवारी येथे सांगितले. मोदी यांनी मंगळवारी सिंगापूरचे पंतप्रधान ली सीन लुंग यांनी मोदींच्या सन्मानार्थ दुपारचे भोजन दिले, त्याप्रसंगी मोदी बोलत होते.
लुंग यांना भेट
- मोदी यांनी त्यांचे सिंगापूरचे समपदस्थ ली सीन लुंग यांना एक अनमोल भेट दिली. ही भेट होती १८४९चा सिंगापूरच्या नकाशाची एक नक्कल. ५२ इंच लांब आणि ५२ इंच रुंद हा नकाशा १८४२ ते ४५ दरम्यान झालेल्या सर्वेक्षणावर आधारित आहे. या नकाशात सिंगापूरचे विस्तृत भौगोलिक विवरण आहे.
पारंपरिक स्वागत
- मोदींनी मंगळवारी सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष टोनी तान केंग यांची भेट घेतली. राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय असलेल्या इस्तानात मोदींचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.
जीएसटीबाबत आशा
- परदेशी गुंतवणूकदारांसाठी आकर्षित करण्याच्या उद्देशाने मोदी यांनी आणखी अधिक सुधारणा घडवून आणण्याचे आश्वासन देताना देशात २०१६ पर्यंत जीएसटी (वस्तू आणि सेवाकर) प्रणाली अस्तित्वात येईल, अशी आशा मंगळवारी येथे व्यक्त केली.