वर्षभरात दहा लाख निर्वासित युरोपात
By admin | Published: December 23, 2015 02:30 AM2015-12-23T02:30:04+5:302015-12-23T02:30:04+5:30
वर्षभरात दहा लाख निर्वासित युरोपात दाखल झाले आहेत. आयओएम अर्थात इंटरनॅशनल आॅर्गनायझेशन फॉर मायग्रेशन या संघटनेने ही माहिती दिली आहे.
ब्रुसेल्स : वर्षभरात दहा लाख निर्वासित युरोपात दाखल झाले आहेत. आयओएम अर्थात इंटरनॅशनल आॅर्गनायझेशन फॉर मायग्रेशन या संघटनेने ही माहिती दिली आहे.
सिरिया, इराक आणि अफगाणिस्तानातून निर्वासितांचे हे स्थलांतर सुरू आहे. यातील आठ लाख जण तुर्की ते ग्रिस या समुद्रमार्गे रवाना झाले आहेत.
आयओएमच्या अहवालानुसार ३६९५ निर्वासित स्थलांतर करताना बेपत्ता झाले आहेत. हे नागरिक समुद्र मार्गाने प्रवास करताना बुडाले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तथापि, निर्वासितांना किती प्रमाणात आश्रय द्यायचा यावरूनही युरोपीय राष्ट्रांमध्ये मतभेद आहेत. स्थलांतरितांपैकी एका लहान मुलाचा मृतदेह समुद्रकिनारी आढळून आल्यानंतर या वर्षात निर्वासितांचे भीषण वास्तव जगासमोर आले होते.
या पार्श्वभूमीवर युरोपीय राष्ट्रांनी निर्वासितांना टप्प्याटप्प्याने आश्रय देण्याचे मान्य केले होते. (वृत्तसंस्था)
> आतापर्यंत वर्षभरात दहा लाख निर्वासितांना ग्रीस, बल्गेरिया, इटली, स्पेन, माल्ता आदी देशात आश्रय देण्यात आला आहे.
९,७२,५०० निर्वासित समुद्रमार्गे आले आहेत.
एकूण निर्वासितांपैकी अर्धे सिरियातील, तर २० टक्के अफगाणिस्तानातील आणि ७ टक्के इराकमधील आहेत.