अबब ! टेनिसबॉलच्या आकाराएवढा हिरा, 347 कोटी रुपयांना केली खरेदी
By पवन देशपांडे | Published: September 27, 2017 11:53 PM2017-09-27T23:53:26+5:302017-09-28T10:59:08+5:30
एखादा हिरा टेनिस बॉलच्या आकाराएवढा असल्यास? खरं वाटणार नाही, पण जवळपास एवढ्याच आकाराच्या एका हि-याची नुकतीच विक्री झाली आहे.
सोथबी (कॅनडा), दि. 28 - एक छोटा हिरा खरेदी करायचा म्हटले तरी सर्वसामान्यांची सर्व बचत खर्ची लागू शकते. त्यामुळे डायमंड रिंगमध्ये असलेल्या छोट्या हि-यांचं आपल्यासाठी मोल अनमोल आहे. परंतु, एखादा हिरा टेनिस बॉलच्या आकाराएवढा असल्यास? खरं वाटणार नाही, पण जवळपास एवढ्याच आकाराच्या एका हि-याची नुकतीच विक्री झाली आहे. तब्बल साडेतीनशे कोटी रुपये रुपयांना एका हिरे व्यापा-यानं या हि-याची खरेदी केली आहे.
जगातील दुस-या क्रमांकाचा सर्वांत मोठा हिरा म्हणून त्याला ओळख मिळाली आहे. आकाराने तो जवळपास टेनिस बॉल एवढा आहे. ब्रिटनमधील लॉरेन्स ग्राफ या हिरे व्यापा-याने हा 1109 कॅरेटचा हिरा तब्बल 347 कोटी रुपये देऊन लिलावात विकत घेतला आहे.
एवढा मोठा हिरा होता कोणाकडे?
- कॅनडाच्या लुकारा डायमण्ड्स कॉर्पोरेशन या कंपनीकडे हा हिरा होता. सध्या तो पैलू न पाडलेल्या स्थितीत आहे.
- एवढा मोठा हिरा घेणार कोण, अशी भीती होती, लुकारा डायमण्ड्स कंपनीचे सीईओ आणि प्रेसिडेंट विल्यम लॅम्ब यांना होती.
- यापूर्वी एकदा या हि-याचा लिलावही आयोजित करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला होता. मात्र त्यासाठी कोणी खरेदीदार मिळाला नव्हता.
- अखेर लॉरेन्स ग्राफ या ब्रिटीश हिरे व्यापाºयाने यासाठी सर्वांत मोठी बोली लावली.
- एवढा मोठा हिरा खरेदी करण्याची क्षमता फार कमी व्यापा-यांकडे आहे आणि त्यातही त्याला पैलू पाडण्याचे कसब खूपच थोडक्या लोकांना आहे.
- सोथबी येथे झालेल्या लिलावात अखेर ग्राफ यांनी तो खरेदी केला.
एवढ्या मौल्यवान खडा कुठे सापडला?
दक्षिण अफ्रिकेतील बोत्सवाना देशात हा हिरा दोन वर्षांपूर्वी 2015 साली नोव्हेंबर महिन्यात सापडला होता. त्याला ‘गिफ्ट आॅफ मदर अर्थ’ असेही म्हटले गेले. बोत्सवाना देशातील त्स्वाना या भाषेत त्याचं नाव ठेवलं ‘लासेडी ला रोना’; म्हणजे ‘आमचा प्रकाश’.
सर्वांत मोठा हिरा कोणता?
जगातील सर्वांत मोठा हिरा 1905 साली दक्षिण अफ्रिकेत सापडला होता. त्याचं नाव ठेवलं गेल कुलिनन डायमंड. तो होता तब्बल 3016.5 कॅरेटचा. त्याला पैलू पाडून त्याचे नऊ वेगवेगळ्या आकाराचे हिरे नंतर बनवण्यात आले होते. त्यातलाच एक मोठा हिरा ब्रिटीशांच्या क्राउल ज्वेल्समध्ये आहे. तसेच त्याचा एक मोठा हिरा ‘ग्रेट स्टार आॅफ अफ्रिका’ म्हणूनही ओळखला जातो. तो तब्बल 530.20 कॅरेटचा आहे.