इस्रायलमध्ये पंतप्रधान नेतन्याहू यांच्याविरुद्ध नागरिकांचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 12:46 AM2020-10-05T00:46:41+5:302020-10-05T00:48:05+5:30
राजीनाम्याची मागणी; आतापर्यंत हजार ठिकाणी निदर्शने
तेल अवीव : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याविरुद्धची आपली मोहीम तीव्र करीत हजारो लोकांनी ठिकठिकाणी निदर्शने केली. यापूर्वी सरकारने कोरोनाचे कारण देत एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने निदर्शकांना जमण्यास बंदी आणली होती.
हे आंदोलक तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून येरुशेलममध्ये पंतप्रधान नेतन्याहू यांच्या निवासस्थानाबाहेर एकत्रित येऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रव्यापी लॉकडाऊनची घोषणा करताना सरकारने मागील आठवड्यात एक नियम लागू केला होता. त्यानुसार, लोकांना त्यांच्या घरांच्या केवळ एक कि.मी.च्या परिसरातच निदर्शने करण्याची परवानगी देण्यात आली होती. नेतन्याहू यांचे म्हणणे आहे की, सुरक्षितता म्हणून हे नियम करण्यात आले आहेत. मात्र, निदर्शकांचे म्हणणे आहे की, प्रतिबंध आणून आमची मोहीम रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. आयोजकांचे म्हणणे आहे की, नव्या नियमांचे पालन करीत देशात एक हजारपेक्षा अधिक ठिकाणी निदर्शने झाली आहेत.