बांगलादेशमधील रस्त्यांवर पुन्हा तणाव, देशभरात रेल्वे ठप्प, लष्कराला करावं लागलं पाचारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 08:33 IST2025-02-04T08:33:38+5:302025-02-04T08:33:55+5:30
Bangladesh Student Protest: मागच्या काही काळापासून राजकीयदृष्ट्या अस्थिर झालेल्या बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात रेल्वेच्या संपामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

बांगलादेशमधील रस्त्यांवर पुन्हा तणाव, देशभरात रेल्वे ठप्प, लष्कराला करावं लागलं पाचारण
मागच्या काही काळापासून राजकीयदृष्ट्या अस्थिर झालेल्या बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात रेल्वेच्या संपामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. हजारोंच्या संख्येने विद्यार्थी रेल्वे रुळांसमोर बसले असून, ते ट्रेन चालू देत नाही आहेत. या आंदोलनामुळे मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील लष्कराच्या चार तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मात्र तरीही विद्यार्थी माघार घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने परिस्थिती अधिकच चिघळत चालली आहे.
ढाका येथील टिटुमीर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी रेल्वे ट्रॅक अडवले आहेत. आपल्या महाविद्यालयाला विद्यापीठाचा दर्जा मिळावा, अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. या विद्यार्थ्यांनी सोमवारी सुमारे ४.१५ च्या सुमारास आंदोलनास सुरुवात केली. या नाकेबंदीमुळे ढाका-टोंगी-ढाका विभागातील रेल्वेसेवा ठप्प झाली. या मार्गावर सध्या कुठलीही ट्रेन चालत नाही आहे. हा विरोध एवढा तीव्र आहे की, अनेक ड्रायव्हर हल्ला होण्याच्या भीतीने ट्रेन चालवण्यास नकार देत आहेत.
रेल्वे पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, परिस्थिती तितकीची चांगली नाही आहे. तणाव प्रचंड असल्याने ट्रेन विविध ठिकाणी थांबवण्यात आल्या आहेत. जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्व होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशारा आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला आहे. आंदोलकांचं नेतृत्व करत असलेल्या अली अहमद याने सांगितले की, जोपर्यंत मोहम्मद युनूस किंवा शिक्षण सल्लागार आमच्या कॉलेजला विद्यापीठ घोषित करत नाहीत, तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवणार आहोत. आम्ही सर्वमान्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मात्र सरकारने आम्हाला हे आंदोलन करण्यास भाग पाडलं आहे.
या नाकेबंदीमुळे ढाका आणि देशातील इतर भागांदरम्यान रेल्वेसेवा बाधित झाली आहे. अनेक गाड्या तेजगाव स्टेशन आणि इतर विमानतळांवर अडकून पडल्या आहेत. ट्रेनचा खोळंबा झाल्याने लोक बसचा पर्याय निवडत आहेत. मात्र तिथेही गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. शहरामध्ये तणाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे देशाच्या सुरक्षेला नवा धोका निर्माण झाला आहे.