तणाव वाढला! इस्रायलने अखेर बदला घेतलाच; इराणच्या शहरावर हवाई हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 05:07 AM2024-04-20T05:07:46+5:302024-04-20T05:08:02+5:30

अण्वस्त्रांचा तळ असलेल्या इराणच्या शहरावर हवाई हल्ला 

tension increased! Israel eventually retaliated Air strike on Iranian city | तणाव वाढला! इस्रायलने अखेर बदला घेतलाच; इराणच्या शहरावर हवाई हल्ला 

तणाव वाढला! इस्रायलने अखेर बदला घेतलाच; इराणच्या शहरावर हवाई हल्ला 

तेहरान : इराणने केलेल्या हल्ल्याचा बदला घेत अखेर इस्रायलनेइराणच्या अण्वस्त्रांचा तळ असलेल्या इस्फहान शहरावर, एअरबेस तसेच  इराक आणि सीरियामध्येही हवाई हल्ले केले. ४६ देशांनी इराणवर हल्ला न करण्याची विनंती इस्रायलला केली होती. मात्र ती धुडकावून लावत अमेरिकेलाही न विचारात घेत हा हल्ला करण्यात आला. यामुळे तणाव वाढला आहे. 

इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचा  ८५वा वाढदिवस असतानाच हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर स्फोटांचे आवाज दूरपर्यंत गेले. मात्र या हल्ल्याला इस्रायलने अद्याप दुजोरा दिलेला नाही. त्याचवेळी इराणने इस्फहानमध्ये ३ ड्रोन पाडल्याचे सांगितले आहे. यापूर्वी इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला होता. हा हल्ला रोखण्यासाठी फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिकेने इस्रायलला मदत केली. इराणचे ९९ टक्के हल्ले रोखण्यात आल्याचे इस्रायलने म्हटले होते. इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलने बदला घेण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर हा हल्ला झाला आहे.

इराण-इस्रायल युद्ध होणार? 
- इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलनेही प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. मात्र, सध्या तरी युद्धाची शक्यता नाही.
- इस्रायलने इराणवर मोठा हल्ला केलेला नाही. इराण आजच्या हल्ल्याचा बदला घेणार नाही. हल्ल्याचा उद्देश केवळ इराणला हानी पोहोचवणे हा नव्हता तर केवळ इशारा देणे हा होता.

‘एअर इंडिया’कडून सेवा स्थगित
इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडिया कंपनीने इस्रायलची राजधानी असलेल्या तेल अवीवसाठीची आपली विमानसेवा येत्या ३० एप्रिलपर्यंत स्थगित केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

‘नागरिकांनो, दोन्ही देशांतून बाहेर पडा’
ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या नागरिकांना इराण, इस्रायलमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले  की, येथे हल्ल्याचा धोका वाढत आहे. परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे.
 
कच्चे तेल महागले
इराण आणि इस्रायलमधील तणाव वाढल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरात ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अमेरिकी तेलाच्या किमती ३.७ टक्क्यांनी वाढून ८६ डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचल्या आहेत.

भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी...
- इराणवरील हल्ल्यानंतर शुक्रवारी दुपारी एक व्यक्ती पॅरिसमधील इराणी वाणिज्य दूतावासात घुसली. यानंतर संपूर्ण परिसराला सुरक्षा दलांनी वेढा घातला. त्या व्यक्तीकडे स्फोटके असल्याचा संशय होता. 
- मात्र, त्याच्याकडे झडती घेतली असता काहीही आढळून आले नाही. जेव्हा त्याला अटक केली जात होती तेव्हा तो फक्त म्हणत होता की, आपल्याला आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला घ्यायचा आहे.

आमचा हात नाही : अमेरिका
- अमेरिकेने शुक्रवारी जी-७ गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांना सांगितले की, इराणमधील ड्रोन हल्ल्याबाबत इस्रायलकडून शेवटच्या क्षणी माहिती मिळाली. आमचा या हल्ल्यामागे कोणताही हात नाही. 
- इटलीच्या मंत्र्यांनी ही माहिती दिली. इटलीचे परराष्ट्र मंत्री अँटोनियो ताजानी म्हणाले की, अमेरिकेने शुक्रवारी सकाळच्या सत्रात समूहाच्या सदस्य देशांच्या बैठकीत ही माहिती दिली.

Web Title: tension increased! Israel eventually retaliated Air strike on Iranian city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.