हंगेरीने लष्कर तैनात केल्याने सीमांवर तणाव
By admin | Published: September 22, 2015 10:28 PM2015-09-22T22:28:57+5:302015-09-22T22:28:57+5:30
हंगेरीने आपल्या सीमांना अधिक सुरक्षित करण्याचे प्रयत्न जोरात चालविले आहेत. सीमेवर लष्कर तैनात करुन स्थलांतरितांना सीमेपासून दूर राहण्याचा इशारा हंगेरीने दिला आहे
बुडापेस्ट : हंगेरीने आपल्या सीमांना अधिक सुरक्षित करण्याचे प्रयत्न जोरात चालविले आहेत. सीमेवर लष्कर तैनात करुन स्थलांतरितांना सीमेपासून दूर राहण्याचा इशारा हंगेरीने दिला आहे. तर नॉर्वेच्या न्यायमंत्री अँडर्स औंडसेन यांनी कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर स्थलांतर होऊ नये यासाठी पोलिसांना सीमा अधिक सुरक्षित करण्याचे आदेश दिले आहे.
सिप्रास यांचे आवाहन
ग्रीसचे नवे पंतप्रधान अॅलेक्सिस सिप्रास यांनी स्थलांतरितांची जबाबदारी सर्व युरोपीय राष्ट्रांनी वाटून घेतली पाहिजे असे वक्तव्य केले आहे. पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यावर सिप्रास यांना कर्जबाजारी देशाला गर्तेतून कसे बाहेर काढायचे आणि स्थलांतरितांचा ताण या प्रश्नांना तोंड द्यायचे आहे. या पार्श्वभूमीमुळे त्यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
सत्तेवर येताच सिप्रास यांनी हा मुद्दा लावून धरल्यामुळे युरोपियन युनियनवर याबाबत तोडगा काढण्याचा दबाव वाढणार आहे. दरम्यान युरोपीय युनियनच्या सदस्य देशांचे मंत्री १, २०,००० स्थलांतरितांचे वाटप कसे करायचे यावर चर्चा करण्यासाठी पुन्हा भेटणार आहेत. स्थलांतरितांच्या सक्तीने वाटपाला पोलंड, स्लोव्हाकिया, हंगेरी, झेक रिपब्लिक यांनी विरोध केलेला आहे. (वृत्तसंस्था)