India China Faceoff: भारत-चीन सीमेवर स्थिती तणावाची; अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 12:43 AM2020-09-06T00:43:31+5:302020-09-06T07:18:05+5:30
कोरोना साथीमुळे अमेरिका व चीनचे संबंध काही प्रमाणात बिघडले आहेत.
वॉशिंग्टन : भारत व चीनच्या सीमेवरील स्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. या दोन देशांमधील सीमा प्रश्न सोडविण्यासाठी अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले की, सर्वसामान्य नागरिकांना वाटते त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात भारत व चीन सीमेवर तणाव आहे. हा सीमा प्रश्न शांततेने व चर्चेच्या मार्गाने सुटणे आवश्यक आहे. त्यासाठी दोन देशांमध्ये अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार आहे. कोरोना साथीचा प्रादुर्भाव चीनच्या वुहान शहरातून झाला. या साथीने अमेरिकेचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
कोरोना साथीमुळे अमेरिका व चीनचे संबंध काही प्रमाणात बिघडले आहेत. चीनच्या प्रयोगशाळेत कोरोनाच्या विषाणूची निर्मिती झाली, असा आरोप अमेरिकेने केला होता. या सर्व स्थितीतच चीनने आपले विस्तारवादी धोरण पुढे चालवत भारताच्या लडाखमधील गलवान खोऱ्यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चिनी लष्कराशी झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. चिनी अॅपवर बंदी घालणे, भारतातील प्रकल्पांची कामे चिनी कंपन्यांना न देणे, असे निर्णय केंद्र सरकारने घेऊन चीनला दणका दिला आहे.
चीनचा भारतविरोधी कट
चीनने भारताची भूमी हडप करण्याचा जो डाव आखला आहे, त्याविरोधात जगातील काही देशांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोरोना साथीमुळे चीनबद्दल या अगोदरच अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, तेथील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात येण्याच्या तयारीत आहेत. या सगळ्या गोष्टींना अटकाव करण्यासाठी चीन प्रयत्नशील आहे. त्यातूनच त्याने भारताविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरू केल्या असल्याचे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांचे मत आहे.