पाकिस्तानातील शेअर बाजारावर मोठा दहशतवादी हल्ला; चकमक सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 11:38 AM2020-06-29T11:38:58+5:302020-06-29T12:00:34+5:30
चारपैकी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश
कराची: पाकिस्तानमधल्या कराचीत दहशतवादी हल्ला झाला आहे. कराची स्टॉक एक्स्चेंजमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. चार दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती प्रशासनानं दिली आहे. यामध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये सध्या चकमक सुरू आहे.
Two killed as terrorists attack Pakistan Stock Exchange in Karachi, people from the building being evacuated: Pakistan media pic.twitter.com/IUeqvtYyoz
— ANI (@ANI) June 29, 2020
दहशतवाद्यांनी कराची शेअर बाजारात शिरताना मुख्य प्रवेशद्वाराजवळ ग्रेनेड हल्ला केला. याशिवाय अंदाधुंद गोळीबारदेखील करण्यात आला. चार दहशतवाद्यांपैकी तिघांचा खात्मा करण्यात यश आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर एक दहशतवादी अद्याप आतमध्ये लपला आहे. हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी लगेचच संपूर्ण परिसर सील केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
चार दहशतवादी अंदाधुंद गोळीबार करत कराचीतल्या शेअर बाजारात घुसले. त्यांनी शेअर बाजाराच्या इमारतीवर गोळीबार आणि ग्रेनेड हल्ला सुरू केला. याची माहिती मिळताच पाकिस्तानी सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचलं. कराचीमध्ये असणारा शेअर बाजार अतिसुरक्षित विभागात येतो. या भागात अनेक खासगी बँकांची मुख्यालयं आहेत. हल्ला करणाऱ्या चारपैकी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती कराची पोलीस दलाचे प्रमुख गुलाम नबी मेमन यांनी दिली.