दहशतवादामुळे जग लोटले गेले संकटाच्या खाईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 06:06 AM2019-03-02T06:06:07+5:302019-03-02T06:06:14+5:30
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज : अनेकांची आयुष्ये झाली उद््ध्वस्त, विविध प्रदेशांत अस्थैर्य
अबु धाबी : दहशतवादामुळे अनेकांची आयुष्ये उद््ध्वस्त होत असून त्यामुळे विविध प्रदेशांत अस्थैर्य निर्माण झाले आहे. या गोष्टींमुळे जग संकटाच्या खाईत लोटले जात आहे असे केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी शुक्रवारी येथे सांगितले.
ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन (ओआयसी) ही ५७ मुस्लीम देशांची संघटना असून त्यांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दोन दिवसीय परिषदेच्या उद््घाटन सोहळ््याला प्रमुख पाहुणा म्हणून भारताला प्रथमच निमंत्रित करण्यात आले आहे. या परिषदेत सुषमा स्वराज यांनी आपल्या सतरा मिनिटांच्या भाषणात सांगितले की, दहशतवादाविरुद्ध सुरू केलेली लढाई ही कोणत्याही धर्माविरुद्ध नाही.
काश्मीरमधील पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी जैश-ए-मोहम्मदने घडविलेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० सीआरपीएफचे जवान शहीद झाले. त्यानंतर भारत व पाकिस्तान यांच्यातील तणाव कमालीचा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सुषमा स्वराज म्हणाल्या की, मुलतत्ववादी व धर्मांध विचारसरणीला भारतातले खूपच कमी मुस्लीम बांधव बळी पडतात. विविध गोष्टींच्या नावाखाली दहशतवादी कारवाया केल्या जात आहेत. या घातपाती कारवाया जिथे होतात त्या प्रदेशाचेच अंतिमत: मोठे नुकसान होत असते. (वृत्तसंस्था)
पाकिस्तानचा बहिष्कार
भारताने २६ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानमधील बालाकोट येथे हवाई हल्ले चढविले होते. या कृतीच्या निषेधार्थ भारताला ओआयसीच्या परिषदेसाठी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहण्यासाठी दिलेले निमंत्रण रद्द करावे अशी मागणी पाकिस्तानने आयोजकांकडे केली होती. पण त्याकडे कोणीही ढुंकून न पाहिल्याने पाकिस्तानने या परिषदेवर बहिष्कार घातला आहे. यासंदर्भात त्या देशाचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी सांगितले की, भारताला आमंत्रित करण्याबाबत ओआयसीने पाकिस्तानशी सल्लामसलत केली नव्हती. भारत या संघटनेचा सदस्य किंवा निरीक्षकही नाही तरीही का बोलाविण्यात आले?