टेरर फंडिंग : फुटीरतावादी नेता गिलानींच्या जावयासहीत 7 जण अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 08:11 AM2017-07-25T08:11:22+5:302017-07-25T12:24:52+5:30
पाकिस्तानकडून आर्थिक रसद घेतल्याच्या आरोपावरुन सोमवारी (24 जुलै) सात काश्मिरी फुटिरतावादी नेत्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) अटक केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - काश्मीर खो-यामध्ये हिंसक कारवाया घडवण्यासाठी तसंच दहशतावाद वाढवण्यासाठी कथित स्वरुपात पाकिस्तानकडून आर्थिक रसद घेतल्याच्या आरोपावरुन सोमवारी (24 जुलै) सात काश्मिरी फुटिरतावादी नेत्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) अटक केली आहे.
जम्मू काश्मीर पोलिसांतील सूत्र तसेच दिल्लीतील एनआयएमधील एका अधिक-यानं दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्यांमध्ये नईम खान, फारूक अहमद डार उर्फ बिट्टा कराटे, अल्ताफ अहमद शाह, शाहिद-उल-इस्लाम, अयाज अकबर, पीर सैफुल्ला व राजा मेहराजुद्दीन कलवल यांचा समावेश आहे.
अल्ताफ शाह हुर्रियतचे कट्टरवादी नेते सय्यद अली गिलानींचा जावई आहे. तर, शाहिद इस्लाम हुर्रियतमधील मीरवाइज उमर फारूकचा जवळचा सहकारी आहे. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या सर्वांना दिल्लीत आणलं जाणार आहे. दरम्यान, पाकिस्तानकडून आर्थिक रसद घेतल्याप्रकरणी मोठ्या प्रमाणात नेत्यांना अटक करण्यात आल्याची ही पहिलीच वेळ असल्याचं सांगितले जात आहे.
एका टीव्ही चॅनेलवर प्रसारित करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये टेरर फडिंगची बाब स्वीकारल्यानंतर हुर्रियतनं नईम खानवर निलंबनाची कारवाई केली होती. या स्टिंग ऑपरेशनमध्ये नईम खाननं म्हटले होते की, काश्मीर खो-यात हिंसक कारवाया घडवण्यासाठी पाकिस्तानकडून आर्थिक रसद घेतली जाते. या गौप्यस्फोटानंतर एनआयएनं मे 2017मध्ये याप्रकरणी काही जणांची चौकशी करण्यास सुरुवात केली. शाहची दिल्लीमध्ये जवळपास दोन आठवड्यांपर्यंत चौकशी सुरू होती.
याप्रकरणी एनआयएनं श्रीनगर, जम्मू, दिल्ली तसेच हरियाणामध्ये छापा टाकला होता. पाकिस्तानकडून पुरवण्यात येणारी आर्थिक रसद स्वीकारणारी व्यक्ती, मध्यस्थी करणारी व्यक्ती तसंच मूळ व्यक्तीसंबंधी ठोस पुरावे हस्तगत केले होते.
एनआयएनं आपल्या तपासाच्या प्राथमिक अहवालात पाकिस्तानातील जमात-उद-दाव व लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदला आरोपी असल्याचं नमूद केले आहे. याशिवाय, अलावा हुर्रियत, हिजबुल मुजाहिद्दीन तसंच दुख्तरान-ए-मिल्लत यांसारख्या दहशतवादी संघटनांचा समावेश केला आहे.
#ExpectToday: NIA to produce 7 separatists including Naeem Khan & Bitta Karate,arrested yesterday, in a Delhi court over terror funding case pic.twitter.com/2A3fb3hvto
— ANI (@ANI_news) July 25, 2017