Terror Funding : पाकिस्तानला FATF कडून पुन्हा झटका, ग्रे लिस्टमध्येच राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 08:30 AM2021-02-26T08:30:20+5:302021-02-26T08:35:48+5:30
गुरूवारी झालेल्या बैठकीत पाकिस्तान ग्रे लिस्टमध्येच राहणार असल्याचं ठरवण्यात आलं.
पाकिस्तान फायनॅन्शिअल अॅक्शन टास्क फोर्सच्या (FATF) ग्रे लिस्टमध्ये कायम राहणार आहे. पाकिस्तानकडूनदहशतवादी आणि दहशतवादी संघटनांना सतत पाठिंबा दिला जातो. अशातच एफएटीएफच्या अॅक्शन प्लॅनच्या २७ निकषांपैकी ३ निकष पूर्ण करण्यात पाकिस्तानला अपयश आलं.
गुरूवारी यासंदर्भातील एक बैठक पार पडली. या बैठकीत पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्येच ठेवण्यात येणार असल्याचं नमूद करण्यात आलं. बऱ्याच वेळेपासून पाकिस्तान एफएटीएफच्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु त्याला यश मिळालेलं नाही. पाकिस्तान निर्धारित २७ निकषांपैकी ३ महत्त्वाचे निकष पूर्ण करू शकला नाही. "पाकिस्तानवर आताही देखरेख ठेवली जाणार आहे. टेटर फायनॅन्सिंगबाबत अद्यापगी काही गंभीर त्रुटी आहेत. पाकिस्ताननं काही महत्त्वाची पावलं उचलली आहेत. परंतु २७ निकषांपैकी ३ निकष अद्यापही पूर्ण झालेले नाहीत," अशी प्रतिक्रिया एफएटीएफचे प्रमुख मार्कस प्लीयर यांनी दिली.
गेल्या वेळी ६ निकष पूर्ण झाले नाहीत
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात एफएटीएफची बैठक पार पडली होती. त्यावेळीही पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्येच ठेवण्यात आलं होतं. तेव्हा एफएटीएफमध्ये तुर्कस्थाननं २७ पैकी ६ निकषांना पूर्ण करण्यासाठी वाट पाहण्याऐवजी सदस्यांना पाकिस्तानच्या चांगल्या कामावर विचार करायला हवा, असा प्रस्ताव सादर केला होता.
एफएटीएफनं गुरूवारी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या कामांच्या प्रगतीबाबात चर्चा केली. परंतु पाकिस्ताननं २७ पैकी २४ निकष पूर्ण केले. पाकिस्ताननला देण्यात आलेली वेळही संपली होती. एफएटीएफनं पुन्हा एकदा पाकिस्तानला जून २०२१ पूर्वी या सर्व निकषांना पूर्ण करण्यास सांगितलं आहे.