ISIS च्या म्होरक्याचा युद्धात खात्मा, दहशतवादी संघटनेने जाहीर केला नवा 'चीफ'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 11:10 AM2022-12-01T11:10:41+5:302022-12-01T11:11:02+5:30
संघटनेच्या प्रवक्त्याने ऑडियो संदेशातून सांगितला नवा नेता
ISIS gets new Chief: कुख्यात दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (ISIS) चा म्होरक्या अबू अल-हसन अल-हाश्मी अल-कुरेशीचा एका चकमकीत मृत्यू झाला आहे. ISIS च्या प्रवक्त्याने टेलिग्राम चॅनलवर पोस्ट केलेल्या ऑडिओ संदेशात ही माहिती दिली. प्रवक्ता म्हणाला की, ISIS ने अबू अल-हुसेन अल-हुसैन अल-कुरेशी याची दहशतवादी संघटनेचा नवा नेता म्हणून निवड केली आहे. अबू अल-हसन अल-हाश्मी अल-कुरेशी विरोधी गटाशी झालेल्या गोळीबारात मारला गेल्याचे प्रवक्त्याने सांगितले. मात्र ऑडिओमध्ये ISIS च्या नव्या नेत्याच्या नावाव्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
ISIS च्या नवीन नेत्याची नियुक्ती
ISIS ने मार्चमध्ये आधीचा म्होरक्या अबू इब्राहिम अल-हाश्मी अल-कुरेशी याच्या मृत्यूनंतर अबू अल-हसन अल-हाश्मी अल-कुरशीला आपला नवीन नेता म्हणून घोषित केले होते. दोन इराकी सुरक्षा अधिकारी आणि एका पश्चिमेकडील सुरक्षा स्रोताच्या म्हणण्यानुसार कुरेशी IS चा माजी खलीफा अबू बकर अल-बगदादीचा भाऊ होता.
कुरेशी आणि बगदादी मारले गेले
कुरेशी आणि बगदादी या दोघांनीही उत्तर सीरियातील त्यांच्या तळांवर अमेरिकेच्या छाप्यांदरम्यान स्वतःला आणि कुटुंबातील सदस्यांना बॉम्बस्फोट घडवून ठार केले. गेल्या दशकात शेजारच्या सीरियातील युद्धाच्या गोंधळातून उदयास आलेल्या इस्लामिक स्टेटने 2014 मध्ये इराक आणि सीरियाचा मोठा भाग ताब्यात घेतला आहे.
हल्ले अजूनही सुरूच
इस्लामिक स्टेटने आपल्या क्रूर राजवटीत चुकीच्या पद्धतीने युवकांना विचारधारेखाली आणले आणि त्याच विचारधारेच्या नावाखाली हजारो लोकांची हत्या केली आहे. इराकी आणि आंतरराष्ट्रीय सैन्याने 2017 मध्ये मोसुलमध्ये या गटाचा पराभव केला. त्यानंतर ISISचे हजारो अतिरेकी अलिकडच्या वर्षांत बहुतेक दुर्गम भागात लपून बसले आहेत. असे असले तरीही ठराविक अंतराने विद्रोह आणि मोठे हल्ले करून जनजीवनावर परिणाम करण्यात ही संघटना कुविख्यात आहे.