पाकिस्तानकडून RSS चा हिंसक राष्ट्रवादी संघटना म्हणून उल्लेख; UNSC मध्ये केली बंदी घालण्याची मागणी
By जयदीप दाभोळकर | Published: January 14, 2021 01:43 PM2021-01-14T13:43:16+5:302021-01-14T13:46:47+5:30
पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकाच्या मुद्द्यावर भाष्य नाही, पाकिस्तानकडून पुन्हा एकदा काश्मीरचा उल्लेख
पाकिस्ताननं पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या व्यासपीठाचा उपयोग भारतविरोधी प्राचारासाठी आणि बेजबाबदार व्यक्तव्यांसाठी केला आहे. संयुक्त राष्ट्रांतील पाकिस्तानच्या राजदूतांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या व्यासपीठावरून थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी केली. इतकंच नाही तर पाकिस्ताननं भाजपा आणि काश्मीरबाबतही संयुक्त राष्ट्रांत अनेक खोटी वक्तव्य केली.
संयुक्त राष्ट्रांतील पाकिस्तानचे राजदूत मुनिर अकरम यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत जगभरातील हिंसक राष्ट्रवादी संघटनांना दहशतवादी संघटना घोषित करण्याची मागणी केली. तसंच त्यांनी आपल्या भाषणादरम्यान भाजपा आणि हिंदू-मुस्लीम यावरही भाष्य केलं. दरम्यान, त्यांनी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या अल्पसंख्यांकांवरील अत्याचारावर आणि त्यांच्या परिस्थितीवर कोणतंही भाष्य केलं नाही.
"भाजपा ही हिंदुत्वाची विचारधारा मानते. भाजपाकडून आपल्या देशातील मुस्लिमांना धमक्याही देण्यात येतात," असं वक्तव्यही मुनीर अकरम यांनी यावेळी केलं. तसंच हिंसक राष्ट्रावादाचा उदय रोखण्यासाठी पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत यावेळी सूचनाही केल्या. पाकिस्ताननं आपल्या सूचनांमध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे सर्व राष्ट्रांनी आपल्या देशातील हिंसक राष्ट्रवादी संघटनांना दहशतवागी संघटना म्हणून घोषित करण्याची मागणी केली. तसंच या संघटनांच्या विचारधारा, त्यात होणारी भरती आणि आर्थिक मदतीवरही तात्काळ बंदी घालण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसंच यावेळी पाकिस्तानकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही उल्लेख करण्यात आला. "राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या राष्ट्रवाही हिंसक समुहांमध्ये सामील करण्यासाठी १२६७ प्रतिबंध समितीचा विस्तार करायला हवा," असंही अकरम म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या देशातील दहशतवाद सोडून अन्य सर्व विषयांवर भाष्य केलं.
पुन्हा काश्मीरचा मुद्दा
संयुक्त राष्ट्रांतील पाकिस्तानचे राजदूत इतक्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्याप्रमाणेत पुन्हा काश्मीरच्या मुद्द्वार भाष्य करत लष्करावरही खोटे आरोप केले. भारतीय लष्करच काश्मीरमध्ये भीती निर्माण करण्याचं काम करत आहे. तसंच लष्कर पाकिस्तानात मानवताविरोधी गुन्हे करत असल्याचंही बेजबाबदार वक्तव्य त्यांनी केलं.