१७५ प्रवासी असलेल्या विमानावर कोसळली वीज; विमान शेकडो फूट खाली आलं, अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 04:42 PM2021-09-30T16:42:22+5:302021-09-30T16:46:06+5:30
विमान हजारो फूट उंचीवर असताना वीज कोसळली; वादळामुळे विमान शेकडो फूट खाली आलं.
रशियात एका विमानावर वीज कोसळल्याची घटना घडली आहे. विमान १७५ प्रवाशांसह हजारो फूट उंचीवर असताना वीज कोसळली. त्यामुळे विमान हादरे बसले. प्रवाशांनी खिडक्यांमधून वीज विमानावर कोसळताना पाहिली. आता जीव वाचणं कठीण असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मात्र काही वेळातच चमत्कार घडला.
अजूर एअरलाईन्सचं बोईंग ७३७ विमानावर वीज कोसळली. त्याआधी विमान वादळात सापडल्यानं ते शेकडो फूट खाली आलं होतं. त्यानंतर विमानावर वीज कोसळल्यानं प्रवासी हादरले. त्यावेळी असलेली विमानातील प्रवाशांची स्थिती एकानं मोबाईलमध्ये टिपली. विमान आकाशातून वेगानं जमिनीच्या दिशेनं कोसळू लागलं होतं. त्यामुळे प्रवाशांनी आशाच सोडून दिली.
अजूर एअरलाईन्सचं विमान एकातेरिनबर्गहून रवाना झालं होतं. मात्र वादळ आणि वीज कोसळल्यानं क्रान्सोडारमध्ये विमानाला एमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. विमानाला भीषण अपघात होणार असून त्यात आपला जीव जाणार, अशी भीती प्रवाशांना वाटत होती. वीज कोसळल्यानं विमानाला जोरदार धक्के बसले. त्यामुळे विमानातील बाटल्या आणि लहान वस्तू सगळीकडे पसरल्या.
विमानावर वीज कोसळताच जोरदार स्फोट झाला. त्यामुळे केबिनमधील वैमानिकांना चिंता वाटू लागली. विमान जमिनीवर कोसळणार असं वाटत होतं. मात्र त्याचवेळी चमत्कार घडला. वैमानिकाला विमानावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. त्यामुळे पुढल्या काही मिनिटांमध्ये विमानानं एमर्जन्सी लँडिंग केलं. मात्र त्याआधी अनेकांच्या पोटात गोळा आला. मृत्यूच्या दाढेतून परतल्यानं प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला.