अतिरेक्यांचा खातमा
By admin | Published: July 3, 2016 04:32 AM2016-07-03T04:32:55+5:302016-07-03T04:32:55+5:30
बांगलादेशातील हॉटेलांत अल्ला हू अकबर असे नारे देत शुक्रवारी गोळीबार करत सुटलेल्या सातपैकी सहा अतिरेक्यांना तेथील सशस्त्र दलाचे जवान व पोलिसांनी शनिवारी सकाळी ठार केले
ढाका : बांगलादेशातील हॉटेलांत अल्ला हू अकबर असे नारे देत शुक्रवारी गोळीबार करत सुटलेल्या सातपैकी सहा अतिरेक्यांना तेथील सशस्त्र दलाचे जवान व पोलिसांनी शनिवारी सकाळी ठार केले आणि एका दहशतवाद्याला जिवंत ताब्यात घेतले. त्यांनी केलेल्या २० परदेशी नागरिक ठार झाले होते. त्यात १८ वर्षांच्या तरुषी जैन या भारतीय मुलीचा समावेश
आहे. जखमींमध्येही एक भारतीय डॉक्टर आहे. दहशतवाद्यांनी काल गोळीबार करीत सर्व ग्राहकांना ओलीस धरले होते. ओलिसांमध्ये प्रामुख्याने परदेशी नागरिक आणि विविध देशांच्या दुतावासांतील अधिकारी होते.
या सर्व ओलिसांची पोलीस व
सशस्त्र दलाच्या जवानांनी शनिवारी सकाळी सुटका केली. त्यासाठी आज सकाळी पोलीस, सशस्त्र जवान आणि कमांडो यांनी एकत्र मिळून मोहीम हाती घेतली. त्यावेळी मोठी धुमश्चक्री झाली. तासभर दोन्ही बाजूंनी गोळीबाराच्या फैरी झडत होत्या. या काळात किमान १00 स्फोट झाले आणि गोळ्या झाडल्याचे हजारांहून अधिक आवाज ऐकू आले. या मोहिमेत सहा अतिरेकी ठार झाले, तर एकाला जिवंत ताब्यात घेण्यात यश आले. दोन पोलीस अधिकारीही मरण पावले. अतिरेक्यांच्या गोळीबारात किमान ४0 जण जखमी झाले असून, त्यात एका भारतीय डॉक्टराचा समावेश आहे.
बांगलादेशात गेल्या काही काळापासून इसिस व अन्य दहशतवादी संघटनांच्या कारवाया सुरू असून, हा हल्ला त्याचाच भाग होता. या हल्ल्यानंतर पश्चिम बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवर तसेच बिहार आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये दक्षतेचा भाग म्हणून सैन्य आणि सीमा सुरक्षा दलाला सतर्क राहण्याचे आदेश आहेत. इसिसचे अतिरेकी सीमेपाशी येऊन ठेपल्यामुळे सीमा सुरक्षा दलांनी दोन्ही देशांच्या सीमेवर जोरदार शोधमोहीम हाती घेतली आहे. (वृत्तसंस्था)
तरुषी सुट्टीसाठी ढाक्यात
अमेरिकेत शिकत असलेली तरुषी इंटर्नशिपसाठी बांगलादेशात आली होती. जैन कुंटुंब मुळचे उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील असून तिचे वडील संजिव जैन यांचा ढाका येथे कपड्यांचा व्यवसाय आहे.
हल्ल्यामध्ये ओलीस ठेवलेल्यांत तरुषी होती. दहशतवाद्यांनी तिची हत्या केल्याचे सांगताना मला अतीव दु:ख होत आहे, असे टष्ट्वीट परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी केले.
भारताला दु:ख : पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान
शेख हसीना यांना दूरध्वनी करून ढाक्यातील जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. भारत संकटाच्या या काळात बांगलादेशसोबत ठामपणे उभा असल्याचे यावेळी ते म्हणाले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला असून, मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.
भारताचे बारीक लक्ष : ओलीस संकटावर भारत बारकाईने लक्ष ठेवून आहे. बांगलादेश सुरक्षा दलाने ओलीस नाट्य संपविण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेबाबत वेगवेगळी माहिती समोर येत असल्यामुळे भारत वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे, असे एका भारतीय अधिकाऱ्याने सांगितले.