दहशतवादाचा हत्यारासारखा वापर होतोय
By admin | Published: November 17, 2015 02:48 AM2015-11-17T02:48:42+5:302015-11-17T02:48:42+5:30
काही देश दहशतवादाचा वापर सरकारी नीतीसारखा करत आहेत. दहशतवादाला धर्मापासून दूर करण्यावर भर देतानाच राजकीय नफा-तोटा बाजूला ठेवून दहशतवादाविरुद्ध
अंताल्या (तुर्कस्तान) : काही देश दहशतवादाचा वापर सरकारी नीतीसारखा करत आहेत. दहशतवादाला धर्मापासून दूर करण्यावर भर देतानाच राजकीय नफा-तोटा बाजूला ठेवून दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाईचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे पुनरुच्चार केला.
जी-२० शिखर परिषदेत ‘जागतिक आव्हान : दहशतवाद आणि शरणार्थी संकट’ या विषयावर येथे आयोजित चर्चेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काही देश दहशतवादाचा वापर हत्यारासारखा करत आहेत. दहशतवाद हे आज जगासमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. दहशतवादाची झळ मृत्यूच्या स्वरूपात समाजाच्या सर्वच घटकांना बसत आहे.
दहशतवादाचा हा जुना फॉर्म्युला आजही कायम आहे. कारण अनेक देश दहशतवादाचा वापर सरकारी नीतीसारखा करत आहेत. ते म्हणाले की, दहशतवादाविरुद्ध जगाला आता एकत्र आवाज करावा लागेल, ठामपणे उभे राहावे लागेल. त्यासाठी अतिरेकी गट आणि त्यांना समर्थन करणारे देश यांच्यात फरक करायला नको. जे देश दहशतवादी कारवायांसाठी मदत करतात त्यांना खड्यासारखे बाजूला टाकण्याची गरज आहे. तथापि, मानवी मूल्यांवर विश्वास असणाऱ्यांना साथ देण्याची गरज आहे. दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदे आणि एकूणच व्यवस्थेत बदल करण्याची गरज आहे. बहुसंस्कृती असलेल्या देशांना दहशतवादाचा धोका अधिक आहे. कारण अतिरेकी कारवायांसाठी भरती व अतिरेक्यांच्या निशाण्यावरही असेच देश असतात, असेही मोदी म्हणाले.
मोदी म्हणाले की, पश्चिम आशिया आणि आफ्रिकेसारख्या देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. निर्वासितांचे संकट हेही मोठे आव्हान असून त्यावर तोडगा काढण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
दहशतवादाचे संकट...अंतलया येथे जी-२० देशांच्या प्रमुखांच्या सुरू असलेल्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगान (उजवीकडे) यांनी सोमवारी भेट घेतली.
जागतिक स्तरावर रणनीती हवी :पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दहशतवाद रोखण्यासाठी विना विलंब जागतिक स्तरावर एक व्यापक रणनीती आखण्याची गरज आहे. अतिरेक्यांपर्यंत पोहोचणारी शस्त्रास्त्रे रोखणे, त्यांचे उत्पन्नाचे स्रोत बंद करणे यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.