पाकसोबतच्या चर्चेत दहशतवादाचा मुद्दा
By admin | Published: March 4, 2015 12:11 AM2015-03-04T00:11:24+5:302015-03-04T00:11:24+5:30
भारत आणि पाकिस्तानने सात महिन्यांच्या खंडानंतर चर्चा सुरू करताना बुधवारी परस्परांच्या चिंता आणि हितांबाबत विचारांची देवाण-घेवाण केली.
इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तानने सात महिन्यांच्या खंडानंतर चर्चा सुरू करताना बुधवारी परस्परांच्या चिंता आणि हितांबाबत विचारांची देवाण-घेवाण केली. परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पाक समपदस्थांबरोबरच्या बैठकीत मुंबई हल्ल्यासह दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला.
सार्क (दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना) दौऱ्यादरम्यान सकाळी येथे पोहोचलेले जयशंकर यांनी एजाज चौधरी यांच्याशी चर्चा केली. भारत शेजारी देशांसोबत सहकार्याचे संबंध निर्माण करू इच्छितो तसेच त्याला सार्ककडून मोठ्या आशा असल्याचे जयशंकर यांनी चौधरींना सांगितले.
‘माझ्या दौऱ्याने आमच्या द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चेची संधी उपलब्ध करून दिली आहे. आम्ही एकमेकांच्या चिंता व हितांबाबत मनमोकळेपणे चर्चा केली. आम्ही संयुक्त आधार शोधून मतभेद कमी करण्यासाठी एकत्र काम करण्यावर सहमत झालो, असे जयशंकर यांनी सांगितले. चौधरींसोबतच्या चर्चेनंतर ते बोलत होते. (वृत्तसंस्था)