China on Terrorism: "दहशतवाद वाघ आहे, तो पाळणाऱ्याला पण खातो"; चीनचा इशारा कोणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 11:39 PM2021-10-08T23:39:11+5:302021-10-08T23:39:39+5:30
China on Terrorism: ग्लोबल काउंटर टेररिज्म फोरमच्या 11 व्या बैठकीत चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी जगाला दहशतवादावरील दुहेरी मानसिकता सोडण्याचा सल्ला दिला आहे.
बिजिंग: अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या कब्जामुळे चीनला देखील आता दहशतवादावर आपला विचार बदलावा लागला आहे. आजवर आपल्या सोयीनुसार दहशतवादाची व्याख्या ठरविणाऱ्या चीनने भारताचीच भाषा बोलण्यास सुरुवात केली आहे.
ग्लोबल काउंटर टेररिज्म फोरमच्या 11 व्या बैठकीत चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी जगाला दहशतवादावरील दुहेरी मानसिकता सोडण्याचा सल्ला दिला आहे. चांगला आणि वाईट असा दहशतवाद असू शकत नाही. त्यांनी दहशतवादाची तुलना जंगली वाघाशी केली, आणि हा वाघ पाळणाऱ्यालाच खातो, असे म्हटले. हा इशारा कोणासाठी होता हे सांगण्याची गरज नाही.
वांग यी यांनी पाकिस्तानचे किंवा अफगाणिस्तानचे नाव घेतले नाही. मात्र, त्यांचा इशारा या दोन देशांनाच होता, असे बोलले जात आहे. आंतरराष्ट्रीय दहशताद हा जगासमोर एक मोठी समस्या घेऊन आला आहे. वांग यांनी दहशतवादाविरोधात सर्व देशांच्या संयुक्त प्रयत्नांची स्तुतीदेखील केली. तसेच दहशतवादी शक्तींना संपुष्टात आणणे अद्याप बाकी आहे, ते वाढत चालले आहेत, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दहशतवादाला आपल्या राजकीय किंवा साम्राज्यवादाच्या फायद्यासाठी वापरणे धोक्याचे आहे. हे म्हणजे जंगली वाघाला पाळीव प्राण्याप्रमाणे पाळण्यासाखे आहे, जे संकटे आणेल, असेही ते म्हणाले.