पाकिस्तानमध्ये पोलीस ठाण्यावर दहशतवादी हल्ला; 10 पोलीस ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 04:38 PM2024-02-05T16:38:58+5:302024-02-05T16:44:54+5:30
पाकिस्तानच्या स्थानिक मीडियानुसार जखमींना डीएचक्यू हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये पोलीस ठाण्यावरच दहशतवादी हल्ला झाला आहे. यामध्ये १० पोलीस कर्मचारी मारले गेले आहेत. डेरा इस्माईल खान जिल्ह्यात दरबानमध्ये हा हल्ला झाला आहे. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी मोठा शस्त्रसाठा घेऊन हा हल्ला केला होता.
पाकिस्तानच्या स्थानिक मीडियानुसार जखमींना डीएचक्यू हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर पोलीस ठाण्यात कमीतकमी १० पोलिसांचा मृत्यू झाला आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दहशतवाद्यांनी पोलिस ठाण्याला घेरले होते. यावेळी त्यांनी ग्रेनेड डागत आणि जोरदार गोळीबार केला.
बेसावध असलेल्या पोलिसांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला परंतु अंधारामुळे दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले. या हल्ल्यानंतर पोलिसांनी परिसरात शोध मोहिम सुरु केली आहे.
पाकिस्तानने भारताविरोधात पोसलेला दहशतवाद आता पाकिस्तानवरच उलटला असून देश पोखरू लागला आहे. याचा परिणाम असा की, जानेवारी महिन्यात 93 दहशतवादी हल्ले झाले आहेत. यामध्ये 90 लोक मारले गेले तर 135 जण जखमी झाले आहेत. 15 जणांचे अपहरण झाल्याची घटनाही समोर आली आहे.