पॅरिसमध्ये दहशतवादी हल्ला, १२७ ठार, १०० जखमी

By admin | Published: November 14, 2015 07:25 AM2015-11-14T07:25:48+5:302015-11-14T16:30:59+5:30

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे, एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या हल्ल्यात जवळपास १५० लोकांचा मृत्यू झाला आहे.

Terrorist attack in Paris, 127 killed, 100 injured | पॅरिसमध्ये दहशतवादी हल्ला, १२७ ठार, १०० जखमी

पॅरिसमध्ये दहशतवादी हल्ला, १२७ ठार, १०० जखमी

Next

ऑनलाइन लोकमत

पॅरिस, दि. १४ - फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे, एकाच वेळी जवळपास सात ते आठ ठिकाणी करण्यात आलेल्या या हल्ल्यात जवळपास १२७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १०० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. त्यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.
फ्रान्सच्या राजधानी पँरिस मध्ये अल्लाहू अकबरच्या घोषणा देत भर जमावावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तर आठ दहशतवाद्यांपैकी सातजणांनी अंगाला स्फोटके बांधली होती, जी उडवण्यात आली.  दरम्यान या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने घेतली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर फ्रान्समध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. गोळीबारातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येते आहे. भारत सरकारने फ्रान्स सरकारकडे सहानुभूती व्यक्त केली आहे, तसेच पॅरीसमधले सगळे भारतीय सुखरूप असतील अशी आशा व्यक्त केली आहे.
पॅरिसमधील स्टेडियमबाहेर एक बॉम्बस्फोट झाला. या स्टेडियममध्ये फ्रान्स आणि जर्मनी यांच्यात फुटबॉलचा सामना सुरु होता. हा सामना पाहण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रास्वा होलांद देखील आले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. स्फोटाच्या आवाजानंतर भेदरलेले सगळे प्रेक्षक खेळाच्या मैदानात उतरले. विशेष म्हणजे, काही वेळातच सावरत मैदानावर उपस्थित प्रेक्षकांनी राष्ट्रगीत म्हटल्याचे सांगण्यात येत आहे. होलांद हे टर्कीच्या दौ-यावर जाणार होते, त्यांनी हा दौरा रद्द केला आहे.  स्टेडियमखेरीज एका कॉन्सर्ट हॉलच्या तसेच एका रेस्टॉरंटजवळ बाँबस्फोट व अंदाधुंद गोळीबार करण्यात आला.
 
दरम्यान, फ्रान्सच्या पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिला दिला आहे.या हल्ल्यामुळे पँरिसमधील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं असून जगभरात अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. फ्रान्समध्ये तीन दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. जगभरातल्या देशांनी फ्रान्सला सहानुभूतीचा संदेश दिला असून दहशतवादाविरोधातली लढाई एकत्र लढण्याचे आश्वासन दिले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांकडून या हल्ल्याचा निषेध केला, फ्रान्सच्या लोकांवर नाही तर मानवतेवर हल्ला आहे असे त्यांनी आपले मत व्यक्त केले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही फ्रान्स सरकारकडे दु:खाच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पॅरीसमधल्या दहशतवादी घटनेच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांनी लवकरता लवकर दहशतवादाची व्याख्या स्पष्ट करावी अशी मागणी नरेंद्र मोदींनी केली आहे. एकदा ही व्याख्या स्पष्ट झाली की कोणता देश दहशतवादाला प्रोत्साहन देतो आणि कोणता देश त्याची शिकार आहे हे स्पष्ट होईल असे मोदी म्हणाले.

Web Title: Terrorist attack in Paris, 127 killed, 100 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.