Video: भररस्त्यात दहशतवाद्याचा खात्मा, इस्रायल सैन्यानं केली नागरिकांची सुटका; व्हिडिओ जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 11:49 AM2023-10-26T11:49:42+5:302023-10-26T12:10:03+5:30
इस्रायल डिफेन्स फोर्सच्या शालदाग युनिटमधील लढवय्या सैनिकांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. गाझा पट्टीतून कार्यरत असलेल्या हमास या संघटनेने दक्षिण इस्रायलवर प्राणघातक हल्ला केला, त्यानंतर दोघांमध्ये युद्ध सुरू झाले. या युद्धात आतापर्यंत चार हजारहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, भारताने दहशतवादी कृत्याविरुद्ध निषेध करता इस्रायलला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, पॅलेस्टाईन नागरिकांच्या मदतीसाठी गरजेच्या वस्तूही पाठवल्या आहेत. गाझा पट्टीवर इस्रायलचं सैन्य आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये जमिनीवर उतरुन ही युद्ध सुरू आहे. त्याचाच एक भाग असलेला व्हिडिओ इस्रायल सैन्य दलाकडून शेअर करण्यात आला आहे.
इस्रायल डिफेन्स फोर्सच्या शालदाग युनिटमधील लढवय्या सैनिकांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये, IDF सैनिकांचे कधीही न पाहिलेले हे फुटेज असून दहशतवाद्याच्या पाठिमागे पळून ते खात्मा करताना दिसत आहेत. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी आणि किबुत्झ बेरीच्या नागरिकांची सुटका करण्यासाठी IDF फोर्स सदैव तत्पर असल्याचं IDF ने हा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे. इस्रायलच्या सैन्य जवानांचं शौर्य या व्हिडिओतून दिसत आहे.
Watch this never-before-seen footage of combat soldiers from the IDF’s Shaldag Unit operating to neutralize terrorists and rescue the civilians of Kibbutz Be’eri:
— Israel Defense Forces (@IDF) October 25, 2023
In the footage, you can see the IDF soliders firing at the terrorists' vehicle, killing the driver who then lost… pic.twitter.com/qnXcqDSzCV
या व्हिडिओ फुटेजमध्ये, IDF सैनिक दहशतवाद्यांच्या वाहनावर गोळीबार करताना दिसून येतात. त्यामुळे, वाहनावरील नियंत्रण गमावल्यानंतर तो कारमधून बाहेर येतो. मात्र, शालदाड युनिटचं सैन्य गाडीजवळ जाऊन त्या चालकाला गोळ्या घालून त्याचा खात्मा करतात. त्यानंतर, युनिटच्या सैनिकांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या सेलमधील इतर दहशतवाद्यांनाही ठार मारले आहे. दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान, IDF च्या विशेष दलांमुळे किबुत्झ बेरीतील रहिवाशी नागरिकांची सुटका झाल्याचंही व्हिडिओत दिसत आहे. ज्यामध्ये, आपल्या लहान मुलांसह, पाळीव प्राण्यांना घेऊन जाताना ते दिसून येतात.
इस्रायलची भारताकडे मागणी
इस्रायलने भारताकडे हमाल संघटनेला दहशवादी म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना इस्रायलच्या राजदूत नाओर गिलोन यांनी हमासविरुद्धच्या दहशतवादविरोधी कारवायांमध्ये इस्रायलला पाठिंबा दिल्याबद्दल भारताचे आभारही व्यक्त केले. तसेच, इस्रायलमध्ये 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या क्रूर हल्ल्यानंतर संबंधित भारतीय अधिकाऱ्यांना हमासला दहशतवादी संघटना घोषित करण्याची विनंती केली आहे. यासोबतच हा मुद्दा यापूर्वीही उपस्थित करण्यात आल्याचे नाओर गिलोन यांनी सांगितले.