भारतविरोधासाठी पाकिस्तानला दहशतवाद्यांचा आधार - अमेरिका
By admin | Published: November 4, 2014 12:21 PM2014-11-04T12:21:20+5:302014-11-04T13:15:33+5:30
पाकिस्तान भारताच्या सशस्त्र सैन्याविरोधात लढा देण्यासाठी दहशतवाद्यांचा आधार घेत असल्याचा अहवाल अमेरिकेतील संरक्षण मंत्रालयाने दिला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. ४ - आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविरोधी वातावरण तयार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाकिस्तानला अमेरिकेकडून चपराक बसली आहे. पाकिस्तान भारताच्या सशस्त्र सैन्याविरोधात लढा देण्यासाठी दहशतवाद्यांचा आधार घेत असल्याचा अहवाल अमेरिकेतील संरक्षण मंत्रालयाने दिला आहे.
अमेरिकेतील संरक्षण मंत्रालय अर्थात पेंटागॉनने नुकताच सहामाही अहवाल सादर केला असून या अहवालात अमेरिकेने पाकिस्तानची पोलखोल केली आहे. अफगाणिस्तान व प्रादेशिक शांततेमध्ये बाधा निर्माण करणारे दहशतवादी पाकमधून काम करत आहेत. पाक या दहशतवाद्यांचा वापर अफगाणमधील कमी झालेल्या प्रभाव आणि भारताच्या शक्तीशाली सैन्याविरोधात करत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. शंभरहून अधिक पानं असलेल्या या अहवालात अफगाणमधील हेरात येथील भारतीय दुतावासावरील हल्ल्याचा संदर्भही देण्यात आला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदूत्ववादी म्हणून ओळखले जातात. मोदींच्या शपथविधी सोहळ्याच्या तीन दिवसांपूर्वी हेरातमध्ये भारतीय दुतावासावर झालेल्या हल्ला हा याच दृष्टीकोनातून झाला असावा असे अहवालात म्हटले आहे. स्थिर आणि सुरक्षित अफगाणिस्तामधील मध्य आशियातील आर्थिक व्यवहारांसाठी उपयुक्त ठरु शकते व भारत यासाठी अफगाणला मदत करत आहे असे यात नमूद करण्यात आले आहे.
सीमा रेषेवर भारताकडून कुरापाती सुरु असल्याचा कांगावा करत पाकिस्तानने भारताविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर गा-हाणे मांडण्याची रणनिती आखली होती. मात्र पाकचे प्रयत्न सुरु असतानाच अमेरिकेने दिलेल्या अहवालामुळे पाकला चपराक बसल्याचे दिसते.