अतिरेक्यांनी पेटविली सल्फरची खाण
By admin | Published: October 24, 2016 03:34 AM2016-10-24T03:34:37+5:302016-10-24T03:34:37+5:30
इराक : इस्लामिक स्टेटच्या (आयएस) अतिरेक्यांनी मोसूल शहरानजिकची सल्फरची खाण काही दिवसांपूर्वी पेटवून दिल्यामुळे विषारी वायू पसरून शेकडो नागरिक आजारी पडले
इर्बिल, इराक : इस्लामिक स्टेटच्या (आयएस) अतिरेक्यांनी मोसूल शहरानजिकची सल्फरची खाण काही दिवसांपूर्वी पेटवून दिल्यामुळे विषारी वायू पसरून शेकडो नागरिक आजारी पडले त्यामुळे इराक आणि अमेरिकेच्या सैनिकांना स्वत:च्या बचावासाठी सुरक्षेची उपकरणे (मास्क) वापरावे लागले.
इराकच्या आरोग्य आणि लष्करी अधिकाऱ्यांनी ही माहिती शनिवारी दिली. मिशराक सल्फर खाणीची आग विझविण्यासाठी अग्निशमन दल प्रयत्न करीत आहे. ही खाण मोसूलच्या दक्षिणपूर्वेला २५ मैलांवर आहे. इराकच्या फेडरल पोलिसांचे प्रवक्ते कर्नल अब्दुलरहमान अल-खझाली यांनी ही माहिती दिली.
मोसूलचा अतिरेक्यांकडून ताबा मिळविण्यासाठी पाच दिवसांपूर्वी सुरू केलेली कारवाई या धुरामुळे विस्कळीत झाली का याची माहिती मात्र त्यांनी दिली नाही. इराकी सैनिकांची मोसूल शहराकडील ओगकूच रोखण्यासाठी अतिरेकी अपारंपरिक उपाय (तेल विहिरींना आग लावणे, कार बाँब्स व ड्रोनचा स्फोट घडविणे) अमलात आणत आहेत. दुसऱ्या प्रयत्नांत अतिरेक्यांनी इराकी सैनिकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यास शुक्रवारी मोसूलच्या पूर्वेकडील किरकुक शहरात सरकारी इमारतींवर हल्ले सुरू केले. (वृत्तसंस्था)