मस्क म्हणतो, पैसे माझे; मुलांचा काय संबंध?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 07:55 AM2023-05-29T07:55:22+5:302023-05-29T07:57:10+5:30

मस्कनं नुकतंच एक जाहीर विधान केलं आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का तर बसला आहेच, पण...

tesla ceo elon musk billionaire the money is mine What about children who is after him business | मस्क म्हणतो, पैसे माझे; मुलांचा काय संबंध?

मस्क म्हणतो, पैसे माझे; मुलांचा काय संबंध?

googlenewsNext

आपल्यानंतर आपली सारी संपत्ती कोणाकडे जावी? राज्याचा एवढा मोठा डोलारा आपण उभारला, या राजगादीचा वारस नंतर कोण व्हावा? राजकारणात एवढी प्रगती केली, शिखर गाठलं, पक्ष स्थापन केला, या पक्षाचा उत्तराधिकारी नंतर कोण व्हावा..? या आणि अशा साऱ्याच प्रश्नांचं उत्तर बहुतेक वेळा येतं ते म्हणजे माझी मुलं, माझे कुटुंबीय किंवा माझे नातेवाईक! जवळपास कोणीच याला अपवाद नाही. घराणेशाहीची ही परंपरा अशीच पुढे चालत राहावी आणि दौलत असो, नाही तर लौकिक... तो आपल्या रक्ताच्या वारसदारांकडेच जावा, अशीच बहुतेकांची इच्छा असते. राजकारणात तर या घराणेशाहीवरूनच बऱ्याचदा  वाद झडतात.

इलॉन मस्कसारखा अब्जाधीश मात्र याला अपवाद असावा. जगातील अब्जाधीशांच्या यादीत कायम अग्रस्थानी असणाऱ्या, टेस्ला, स्पेसएक्सचा मुख्य कार्यकारी अधिकारी असलेला आणि ट्विटरची मालकी आपल्या ताब्यात घेतल्यापासून तर जवळपास रोजच माध्यमांवर झळकणारा आणि वादविवादांच्या भोवऱ्यात असलेल्या इलॉन मस्कनं नुकतंच एक जाहीर विधान केलं आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का तर बसला आहेच; पण अनेकांनी त्यावरून इलॉन मस्कचं भरभरून कौतुकही केलं आहे. 

इलाॅन मस्कचं म्हणणं आहे, माझ्या या अब्जावधी डॉलर्सच्या संपत्तीचा वारसा माझ्या मुलांकडे जाणार नाही. ती केवळ माझी मुलं आहेत, म्हणून त्यांना गादी उबवायला मिळणार नाही. प्रत्येकालाच आपली लायकी आधी सिद्ध करावी लागेल, मग ती माझी मुलं असोत, नाही तर माझ्या कंपनीतला कोणी कर्मचारी! त्यामुळे निदान नजीकच्या भविष्यकाळात तरी माझ्या कंपन्यांच्या प्रमुखपदी माझी मुलं दिसणार नाहीत. माझ्या अनुपस्थित माझ्या कारभाराची नौका कोणाच्या हाती असेल, याची यादीही मी तयार करून ठेवली आहे.

सध्या तरी माझ्या मुलांची नावं त्यात नाहीत. ज्या व्यक्तींमध्ये, ज्या कर्मचाऱ्यांमध्ये त्या त्या कंपन्यांचा गाडा सुरळीतपणे ओढण्याची आणि या कंपन्यांना पुढे नेण्याची क्षमता आहे, ज्यांच्या कृतीतून ते दिसतं आहे, तेच माझ्या कारभाराचे उत्तराधिकारी असतील. क्षमता आणि लायकी नसतानाही केवळ आपली मुलं, आपले नातेवाईक आहेत, म्हणून परंपरेनं त्यांच्याकडंच वारसा सोपवणाऱ्यांमधला मी नाही! 

कधी आपल्या प्रेमप्रकरणांवरून, कधी आपल्या वक्तव्यांवरून, तर कधी ‘विचित्र’ वाटणारे निर्णय घेतल्यामुळे इलॉन मस्क कायमच माध्यमांच्या झोतात आणि चर्चेत राहिला आहे. आता त्याचं हे नवीन विधान खरोखरच प्रामाणिक आहे, तो मनापासून हे बोलतो आहे, की चर्चेत राहण्यासाठी त्यानं हे एक नवीनच पिल्लू सोडून दिलं आहे, हे येणारा काळच ठरवेल; पण सध्या तरी यामुळे तो चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

इलॉन मस्कचं म्हणणं आहे, दुर्दैवानं मला काही झालंच, तर त्यानं काहीही फरक पडणार नाही. अशा वेळी काय करायचं, कोणाकडे कोणती जबाबदारी द्यायची हे सगळं संचालक मंडळाला माहीत आहे. ज्या कंपन्यांची मी निर्मिती केली आहे, ज्या कंपन्या पुढे निर्माण होत आहेत, त्या सगळ्या मी सामूहिकपणे तयार करतो आहे. एका रात्रीत हे झालेलं नाही. यासाठी खूप मेहनत लागते. अहोरात्र काम करावं लागतं. त्यांची धुरा याेग्य व्यक्तीच्याच हातात गेली पाहिजे. 

आपला उत्तराधिकारी कोण असावा, हा आजचा प्रश्न नाही. राजेमहाराजांपासून जगातल्या बड्या बड्या हस्तींना आजवर याच प्रश्नानं सर्वाधिक छळलं आहे. या प्रश्नाला कोणतंही ठरावीक असं उत्तर नाही. एखादा मोठा उद्योग असो, एखादं राज्य असो, एखादं घराणं असो किंवा मोठा वारसा, ज्या ज्या वेळी चुकीच्या व्यक्तींच्या हाती सत्ता गेली, धुरा गेली, त्या त्या वेळी त्याचं वाटोळं व्हायला वेळ लागलेला नाही. मला यातलं काहीही होऊ द्यायचं नाही आणि तसं काही होणारही नाही. आता काय करावं, कंपनीची धुरा कोणी चालवावी..? अशी आणीबाणीची परिस्थिती कोणावरही येऊ नये; पण आलीच तर अशा वेळी हतबल होता कामा नये. पर्याय बी, पर्याय सी, आपल्याकडे तयारच असायला हवेत. त्यामुळेच मी हे सारे पर्याय तयार ठेवले आहेत. आपली मुलं ‘आपली’च असतात; पण म्हणून त्यांनाच ड्रायव्हिंग व्हीलवर बसवणं हा मूर्खपणा आहे. असा मूर्खपणा निदान माझ्याकडून तरी होणार नाही...

प्रेमप्रकरणं, लग्नं आणि मुलं! 
इलॉन मस्कची प्रेमप्रकरणं जशी गाजली आहेत, तशीच त्याची लग्नंही. त्याची तीन अधिकृत लग्नंही झाली आहेत. त्याची किती प्रेमप्रकरणं झाली, याची तर गिणतीच नाही. त्यांच्यापासून त्याला चक्क दहा मुलंही आहेत. त्यांची नावंही त्यानं इतकी चित्रविचित्र ठेवली आहेत, की त्यांचा उच्चारही करता येऊ नये! एकूणच या ‘मिस्ट्री मॅन’नं आपल्याभोवतीचं गूढ सतत कायम ठेवलं आहे.

Web Title: tesla ceo elon musk billionaire the money is mine What about children who is after him business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.