हायस्पीड हायपरलूप ट्रेनमुळे 3 तासाचा प्रवास फक्त तासाभरात
By dinanath.parab | Published: August 3, 2017 04:14 PM2017-08-03T16:14:23+5:302017-08-04T12:14:11+5:30
हायपरलूप म्हणजे हायस्पीड स्पीडने धावणारी रेल्वे. अशा प्रकारची रेल्वे तयार करण्याच्या मार्गातील एक एक महत्वाचा टप्पा पार केल्याचे हायपरलूप वनकडून बुधवारी सांगण्यात आले.
वॉशिंग्टन, दि. 3 - हायपरलूप म्हणजे हायस्पीडने धावणारी रेल्वे. अशा प्रकारची रेल्वे तयार करण्याच्या मार्गातील एक एक महत्वाचा टप्पा पार केल्याचे हायपरलूप वनकडून बुधवारी सांगण्यात आले. त्यामुळे ताशी 192 मैल म्हणजे 308 किलोमीटर वेगाने धावणा-या रेल्वेचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात साकार होऊ शकते. इलेक्ट्रिक कार मेकर टेस्ला आणि रॉकेट कंपनी स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांची हायपरलूप वन कंपनी हायपरलूप सिस्टिमची उभारणी करणार आहे.
मागच्या आठवडयात लास वेगासमध्ये खासगी जागेत उभारलेल्या 500 मीटरच्या ट्रॅकवर संपूर्ण हायपूरलूप सिस्टिमची यशस्वी चाचणी घेण्यात आली. यावेळी वेगाचा नवीन उच्चांक नोंदला गेला असे हायपरलूप वनकडून सांगण्यात आले. ही चाचणी यशस्वी होणे ही आमच्यासाठी एक मोठी बाब आहे असे हायपरलूप वनचे सहसंस्थापक शेरवीन पीसहीवर यांनी सांगितले. या चाचणीतून हायपरलूप तंत्रज्ञानाने प्रवासी वाहतूक शक्य असल्याचे आम्ही सिद्ध केले आहे. आता यापुढे ख-या अर्थाने हायपरलूप टेक्नॉलॉजीवर व्यावसायिक अंगाने काम सुरु होईल असे शेरवीन यांनी सांगितले.
हायपरलूप ट्रेन ही चुंबकीय शक्तीवर आधारीत टेक्निक आहे. हा भुयारी वाहतूक प्रकल्प आहे. निर्वात भुयारी पोकळीतून पॉड किंवा टयुबमधून प्रवासी आणि मालवाहतूकीची योजना आहे. हायपरलूप ट्रेनने चाचणीच्यावेळी ताशी 308 किलोमीटर वेग गाठला. हे तंत्रज्ञान यशस्वी ठरु शकते हे आम्ही सिद्ध केले. आता हा प्रकल्प प्रत्यक्षात साकारण्यासाठी त्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी विविध देशातील सरकारे, उद्योजक यांच्याशी चर्चा सुरु करणार आहोत असे मुख्य अधिकारी रॉब लॉईड यांनी सांगितले. हायपरलूप टेक्नॉलॉजी प्रत्यक्षात आल्यानंतर मुंबई-पुणे प्रवास फक्त काही मिनिटांवर येईल. रेल्वेमार्गे मुंबई-पुणे अंतर 89 किलोमीटर आहे. या प्रवासाला दीड ते दोन तासांचा वेळ लागतो. हायपरलूप ट्रेनमुळे तुम्ही काही मिनिटात मुंबईहून पुण्याला पोहोचू शकता.
काही दिवसांपूर्वी एलोन मस्क यांनी हायपरलूप तंत्रज्ञानावर आधारीत भुयारी वाहतूक प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याचे टि्वटरवरुन जाहीर केले होते. हा प्रकल्प आकाराला आला तर, न्यूयॉर्क ते वॉशिंग्टन या दोन शहरांमधील अंतर फक्त 29 मिनिटात पार करता येईल. मस्क यांनी तोंडी मंजूरी मिळाल्याचे जाहीर केल्यानंतर अशा कोणत्याही प्रकल्पाला मंजुरी दिली नसल्याचे वॉशिंग्टन व न्यूयॉर्कमधील अधिका-यांनी सांगितले.
फेडरल नियमानुसार एलोन मस्क यांना हायपरलूप सारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी पर्यावरणविषयक आणि अन्य परवानग्या घ्यावा लागतील. हा प्रकल्प अधिक वेगाने व्हावा असे आपल्याला वाटत असेल तर, तुम्ही तुमच्या स्थानिक लोकप्रतिनिधीला याची माहिती द्या असे आवाहन मस्क यांनी केले. एलोन मस्क यांनी सर्वप्रथम 2012 मध्ये त्यांची हायपरलूप ट्रान्सपोटेशनची कल्पना जाहीर केली होती. 2013 मध्ये मस्क यांनी लॉस एंजल्स ते सॅन फ्रान्सिस्कोमध्ये 640 किलोमीटरचे हायपरलूप नेटवर्क उभारण्यासाठी 6 अब्ज डॉलरपेक्षा कमी खर्च येईल तसेच हा मार्ग उभारणीसाठी सात ते दहावर्ष लागतील असे सांगितले होते.
सुपरसॉनिक म्हणजे काय
- ज्या वस्तूचा वेग ध्वनीपेक्षा जास्त आहे त्याला सुपरसॉनिक स्पीड म्हटले जाते. ताशी 990 किलोमीटर वेगाने प्रवास म्हणजे सुपरसॉनिक स्पीड. सुपरसॉनिकच्या पुढचा टप्पा असतो हायपरसॉनिक स्पीड. ज्या वस्तूचा ध्वनीपेक्षा पाचपट जास्त वेग आहे त्याला हायपरसॉनिक म्हटले जाते. आजच्या घडीला अमेरिकेकडे अशी हायपरसॉनिक श्रेणीत मोडणारी क्षेपणास्त्रे आहेत. जी तासाभराच्या आत जगात कुठेही लक्ष्यभेद करु शकतात.
- आज जगातील अनेक देशांकडे सुपरसॉनिक गतीने उड्डाणाची क्षमता असलेली अत्याधुनिक लढाऊ विमाने आहेत. भारताकडे असलेले सुखोई-30 आणि भारत आता फ्रान्सकडून जे रफाएल विमान विकत घेणार आहे ते सुपरसॉनिक गटात मोडते.
- फ्रान्सचे कॉनकॉर्ड, टयुपोलेव्ह टीयू-144 ही सुपरसॉनिक स्पीड असलेली प्रवासी विमाने होती. पण आता या विमानाचा वापर बंद झाला असून, 26 नोव्हेंबर 2003 रोजी कॉनकॉर्डने शेवटचे उड्डाण केले.
- न्यूयॉर्क ते वॉशिंग्टन हे 226 मैलाचे म्हणजे 363 किलोमीटरचे अंतर आहे. रस्ते मार्गाने हे अंतर गाठायला 4 तास, रेल्वेने 2 तास 55 मिनिट तर, विमानाने अर्धा तास लागतो. आता हायपरलूप ट्रेनमुळे या प्रवासाला तासाभराचा वेळ लागेल.
- हायपरलूप टेक्नोलॉजी ही मूळ एलोन मस्क यांची कल्पना आहे. त्यांनी ताशी 1120 किलोमीटरचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे भविष्यात ही हायस्पीड रेल्वे सुपरसॉनिक बनू शकते.