चीनकडून भारत व अमेरिकेवर हल्ला करू शकणा-या क्षेपणास्त्राचं परीक्षण
By admin | Published: February 6, 2017 05:33 PM2017-02-06T17:33:20+5:302017-02-06T17:42:54+5:30
रॉकेट फोर्सच्या वेगानं मारा करू शकणा-या अत्याधुनिक डीएफ-16 या क्षेपणास्त्रासोबत युद्धाभ्यास केला
ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 6 - चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी(पीएलए)ने रॉकेट फोर्सच्या वेगानं मारा करू शकणा-या अत्याधुनिक डीएफ-16 या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रासोबत युद्धाभ्यास केला आहे. डीएफ-16 हे क्षेपणास्त्र 1000 किलोमीटरहून अधिक अंतरावरच्या प्रदेशालाही लक्ष्य करू शकते. भारत, जपान आणि अमेरिकेला भीती दाखवण्यासाठीच चीननं हे शक्तिप्रदर्शन केल्याची चर्चा आहे.
शस्त्रास्त्रांबाबत गोपनीयता बाळगणा-या चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने पहिल्यांदाच बॅलिस्टिक क्षेपणास्त्र एफ 16 सोबत करण्यात आलेल्या युद्धाभ्यासाचा व्हिडीओ व्हायरल केला आहे. चीनच्या रॉकेट फोर्सच्या शस्त्रागारात वेगवेगळे मारक क्षमता असणा-या क्षेपणास्त्रांची काळजी घेण्यासाठी विशेष तुकडी तैनात असते.
या व्हिडीओमध्ये रॉकेट फोर्समधील क्षेपणास्त्रांसोबत युद्धाभ्यास करणा-या सैनिकांचे प्रशिक्षण दाखवण्यात आलं असून, यात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रासोबत युद्धाभ्यासाचं चित्रीकरणही पाहायला मिळतं आहे. चीननं तिस-यांदा डीएफ-16 या क्षेपणास्त्रासोबत सराव केला आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दक्षिण चिनी समुद्रातील दाव्यावर कठोर धोरण अवलंबणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर चीननं अमेरिकेला भीती दाखवण्यासाठी हा युद्धाभ्यास केल्याची चर्चा आहे.