थायलंड हल्ला, संशयिताचा शोध सुरू
By admin | Published: August 18, 2015 10:32 PM2015-08-18T22:32:36+5:302015-08-18T22:32:36+5:30
थायलंड प्रशासनाने बँकॉकमध्ये स्फोट घडवून आणणाऱ्या संशयिताचा शोध सुरू केला आहे. देशाच्या सर्वांत भयंकर अशा या हल्ल्यात २० लोक ठार झाले होते
बँकॉक : थायलंड प्रशासनाने बँकॉकमध्ये स्फोट घडवून आणणाऱ्या संशयिताचा शोध सुरू केला आहे. देशाच्या सर्वांत भयंकर अशा या हल्ल्यात २० लोक ठार झाले होते. हा संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान, नौकाघाटावर बॉम्ब फेकण्यात आल्यामुळे थायलंड मंगळवारी पुन्हा हादरला. सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झाली नाही. फेकलेला बॉम्ब उसळून पाण्यात पडला व पाण्यातच त्याचा स्फोट झाला. त्यामुळे हानी टळली. सोमवारी ब्रह्म मंदिराजवळ शक्तिशाली बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आल्यानंतर बँकॉकमध्ये झालेला हा दुसरा हल्ला आहे.
थायलंडचे पंतप्रधान प्रयुत चान ओ चा यांनी या हल्ल्यामागे कोण आहे याचे प्राथमिक संकेत मिळाल्याचे सांगितले. आज आमच्याकडे एक संशयित आहे. आम्ही या व्यक्तीचा शोध घेत आहोत, असे त्यांनी सांगितले. संशयित हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पिवळा शर्ट परिधान केलेल्या या संशयिताच्या पाठीवर एक पिशवीही दिसते, असे ते म्हणाले. सोमवारच्या हल्ल्यात ११ परदेशी नागरिक ठार झाले. मृत परदेशी नागरिकांत पाच चिनी, एक इंडोनेशियन, चार मलेशियन आणि सिंगापूरच्या एकाचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)