थायलंड - पवित्र बैलांनी वर्तवला चांगल्या पावसाचा अंदाज
By admin | Published: May 9, 2016 05:58 PM2016-05-09T17:58:47+5:302016-05-09T17:58:47+5:30
पवित्र बैलांनी येत्या मोसमात चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आणि दुष्काळाने ग्रासलेल्या थायलंडवासियांनी सुटकेचा निश्वास सोडला
Next
>ऑनलाइन लोकमत
बँकॉक (थायलंड), दि. 9 - पवित्र बैलांनी येत्या मोसमात चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आणि दुष्काळाने ग्रासलेल्या थायलंडवासियांनी सुटकेचा निश्वास सोडला. थायलंडमध्ये दरवर्षी नांगरणीची सुरुवात शाही इतमामात होते. भाताच्या पिकापासून सुरुवात करण्याची इथं फार जुनी परंपरा आहे.
परंपरेने चालत आलेल्या पद्धतीप्रमाणे हा सोहळा साजरा केला जातो. शांत स्वभावाच्या परंतु नियमात बसणारी अंगकाठी असलेल्या जनावरांना यावेळी विविध खाद्य दिलं जातं. यंदा निवड झालेल्या पांढऱ्या बैलांनी भात, गवत, पाणी आणि देशी मद्य खाण्यासाठी निवडलं. त्यांची ही खाद्य पदार्थांची निवड यंदा पुरेसा पाऊस, भरपूर पिक आणि चांगला विदेश व्यापार सुचवते असं अनुमान थायलंडच्या पशुउद्योग खात्यानं काढलं आहे.
गेल्या वर्षीही बैलांनी चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला होता, परंतु जो चुकीचा ठरला. त्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई अनेक भागात भेडसावत आहे. तसेच, पिकं न आल्यामुळे शेतकरी मोठ्या संख्येने कर्जबाजारी झाले आहेत.
यंदा मात्र, पवित्र बैलांचा अंदाज योग्य ठरेल असा विश्वास परंपरा मानणाऱ्यांना आहे.
सरकारी अधिकारी पारंपरिक वेशात या बैलजोडीसोबत सोहळ्यात सहभागी झाले होते. तसेच राजधानीतल्या या समारंभात नागरिकही उत्साहानं सहभागी झाले होते.