थायलंडच्या राजाच्या 'चौथ्या लग्नाची गोष्ट'; स्वतःच्या 'बॉडीगार्ड'शीच केलं शुभमंगल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 03:15 PM2019-05-02T15:15:49+5:302019-05-02T15:21:11+5:30
राजघराणं आणि सामान्य जनता यांच्यातील दरी कमी करण्याच्या उद्देशाने थायलंडचे राजे वजिरालॉन्कोर्न यांनी एक ऐतिहासिक काम केलं आहे.
राजघराणं आणि सामान्य जनता यांच्यातील दरी कमी करण्याच्या उद्देशाने थायलॅंडचे राजे वजिरालॉन्कोर्न यांनी एक ऐतिहासिक काम केलं आहे. त्यांच्या राज्याभिषेकाच्या आधीच त्यांनी त्यांच्या पर्सनल बॉडीगार्ड फोर्सच्या डेप्युटी हेड सुथिदासोबत लग्न केले. राजा वजिरालॉन्कोर्न यांनी सुथिदा तिजाई यांना राणीचा दर्जा दिला आणि आता त्या राज परिवारासोबत राहतील. खास बाब ही आहे की, याआधी याबाबत काहीच चर्चा झाली नव्हती. बुधवारी अचानक या लग्नाची घोषणा करण्यात आली.
काही वर्षांपासून होते रिलेशनमध्ये
थायलंडच्या वृत्तवाहिन्यांवर आधी लग्नाच्या घोषणेची माहिती दिली गेली आणि काही वेळाने राजा - राणीच्या लग्नाचा व्हिडीओ सुद्धा दाखवण्यात आला. असे सांगितले जात आहे की, गेल्या काही वर्षांपासून सुथिदा राजा वजिरालॉन्कोर्नसोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. पण दोघांनीही अधिकृतपणे याबाबत काहीही सांगितले नाही.
एक वर्षाआधी झालं होतं वडिलांचं निधन
राजा वजिरालॉन्कोर्न ६६ वर्षाचे आहेत. २०१७ मध्ये त्यांचे वडील राजा अतुल्यतेज भूमिबोल यांचं निधन झालं होतं. त्यानंतर त्यांना राजा घोषित करण्यात आलं. राजा अतुल्यतेज यांच्या निधनावर एक वर्षांचा शोक घोषित करण्यात आला होता. त्यामुळे राजा वजिरालॉन्कोर्न यांचा राज्याभिषेक करता आला नव्हता.
आधीही झाली आहेत तीन लग्ने
राजा वजिरालॉन्कोर्न यांची याआधीही तीन लग्ने झाली आहेत. तसेच त्यांना या तीन पत्नींपासून ७ अपत्ये आहेत. राजा वजिरालॉन्कोर्न आणि सुथिदा यांचा विवाह आधी पारंपरिक पद्धतीने आणि नंतर रजिस्टर करण्यात आला.
राजघराण्यात लग्न झाल्यानंतर सुथिदा यांच्याबद्दलची उत्सुकता लोकांमध्ये अधिक वाढली आहे. २०१४ मध्ये वजिरालॉन्कोर्न यांनी सथिदा तिजाई यांना पर्सनल बॉडीगार्ड यूनिटमध्ये डेप्युटी कमांडर म्हणूण नियुक्ती केली होती. त्याआधी सुथिदा थायलंड एअरवेजमध्ये फ्लाइट अटेंडेंट म्हणूण काम करत होत्या. वजिरालॉन्कोर्न हे राजा झाल्यावर त्यांनी सुथिदा यांना २०१६ मध्ये सेनेत जनरल हे पद दिलं होतं. २०१७ मध्ये त्या राजासोबत पर्सनल बॉडीगार्ड म्हणूण राहू लागल्या.