पार्कमध्ये धावत असताना पडली थायलंडची राजकुमारी, आला हृदयविकाराचा झटका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 04:54 PM2022-12-15T16:54:14+5:302022-12-15T16:55:04+5:30
Thai Princess Bajrakitiyabha : 44 वर्षीय राजकुमारी बजरकितियाभा या बुधवारी पहाटे बेशुद्ध पडल्यानंतर ईशान्य नाखोन रत्चासिमा प्रांतातील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.
थायलंडची राजकुमारी आणि राजा महा वजिरालोंगकोर्न यांची मोठी मुलगी बजरकितियाभा नरेंद्रिरा देव्यावती यांना हृदयविकाराच्या झटका आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात रॉयल पॅलेसने माहिती दिली आहे. 44 वर्षीय राजकुमारी बजरकितियाभा या बुधवारी पहाटे बेशुद्ध पडल्यानंतर ईशान्य नाखोन रत्चासिमा प्रांतातील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रॉयल पॅलेसने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राजकुमारी बजरकितियाभा यांची प्रकृती एका विशिष्ट स्तरावर स्थिर झाल्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरने बँकॉकला नेण्यात आले. राजकुमारी या राजा वजिरालोंगकोर्न यांच्या तीन अपत्यांपैकी एक आहेत. त्या 1924 च्या पॅलेस लॉ ऑफ सक्सेशननुसार सिंहासनासाठी पात्र आहेत. खाओ याई नॅशनल पार्कमध्ये आपल्या कुत्र्यांसह धावत असताना राजकुमारी बजरकितियाभा यांच्या तोल गेल्याने खाली पडल्याचे सांगितले जात आहे.
यादरम्यान त्यांना तासाभराहून अधिक काळ सीपीआर देण्यात आला, पण राजकुमारी बजरकितियाभा यांना फारसा फायदा झाला नाही. तसेच, त्यांना ऑक्सिजन मशीनवर ठेवण्यात आल्याचा दावा केला जात आहे. बुधवारी खाओ यईहून बँकॉकला परतताना तीन मोठे लष्करी हेलिकॉप्टरही विलक्षण रात्री उशिरा दिसले. तेथून राजकुमारी बजरकितियाभा यांना ईसीएमओ उपचारासाठी बँकॉक रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, प्रत्यक्षदर्शिनीं दोन लष्करी हेलिकॉप्टरसह हॉस्पिटलचे हेलिकॉप्टर पाहिले.
थायलंडमध्ये कायदा आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये पदवी प्राप्त करण्यापूर्वी राजकुमारी बजरकितियाभा यांचे अंशतः शिक्षण ब्रिटनमध्ये झाले होते. नंतर त्यांनी न्यूयॉर्कमधील कॉर्नेल विद्यापीठातून कायद्यात पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी पूर्ण केली. 2012 मध्ये त्या ऑस्ट्रियामध्ये थायलंडच्या राजदूत होत्या आणि व्हिएन्ना येथील संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयात स्थायी प्रतिनिधी होत्या. तसेच, राजकुमारी बजरकितियाभा यांनी थाई कायदेशीर व्यवस्थेतही पदे भूषवली आहेत.