थँक यू, पण घरबसल्या किमान उत्पन्न नको!
By Admin | Published: June 6, 2016 02:05 AM2016-06-06T02:05:46+5:302016-06-06T02:05:46+5:30
देशात राहणाऱ्या प्रत्येकास सरकारी तिजोरीतून किमान हमी उत्पन्न म्हणून ठराविक रक्कम कोणतीही पूर्वअट न घालता द्यावी का, अशा अनोख्या प्रस्तावावर स्वित्झर्लंड या धनाढ्य देशात
झ्युरिच/बर्न : देशात राहणाऱ्या प्रत्येकास सरकारी तिजोरीतून किमान हमी उत्पन्न म्हणून ठराविक रक्कम कोणतीही पूर्वअट न घालता द्यावी का, अशा अनोख्या प्रस्तावावर स्वित्झर्लंड या धनाढ्य देशात रविवारी सार्वमत घेण्यात आले व त्यात नागरिकांनी मोठ्या बहुमताने हा प्रस्ताव अमान्य केला.
अशा प्रकारची कल्पना मांडून त्यावर सार्वमत घेतले जाण्याची जगातील बहुधा ही पहिलीच वेळ होती व त्याचा निकालही अपेक्षेप्रमाणेच लागला. स्वित्झर्लंडमध्ये लोकनियुक्त सरकार शासन करीत असले तरी तेथे ‘थेट लोकशाही’ची पद्धत रुढ आहे. त्यानुसार कोणीही नागरिक लोककल्याण आणि सामाजिक महत्वाच्या विषयांवर आपले विचार मांडून त्यावर सार्वमताने लोकांचा कौल घेऊ शकतो.
रविवारच्या सार्वमतासाठी ज्या प्रस्तावावर कौल घेण्यात आला त्यानुसार देशातील प्रत्येक प्रौढ नागरिकास २,५०० स्विस फ्रँक (सुमारे १.७१ लाख रु.) व १८ वर्षांखालील मुलांना ६२५ फ्रँक एवढी रक्कम सरकारने किमान हमी उत्पन्न म्हणून देण्याची कल्पना होती. ही रक्कम मिळण्यासाठी कामधंद्यासह कोणताही पूर्वअट नसावी.
बेसेल येथील एका उपाहारगृहाचा मालक डॅनियल हाएनी आणि त्याच्या साथीदारांनी हा प्रस्ताव सार्वमतासाठी मांडला होता. रविवारी सायंकाळी मतदान संपल्यावर एसआरएफ या वृत्तवाहिनेने जाहीर केलेल्या ‘एक्झिट पोल’नुसार पाचपैकी चार नागरिकांनी (सुमारे ८० टक्के) हा प्रस्ताव अमान्य केला.
हाएनी यांनी पराभव मान्य करतानाच नैतिक विजयाचा दावाही केला.